गेल्या काही वर्षांत मशरूम खाण्याचे प्रमाण वाढत आहे. मशरूम मध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि विटामिन डी असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी, तरुण दिसण्यासाठी आणि बुध्दीसाठी ते खूप फायदेशीर ठरते. मशरूम खाल्ल्यावर बराच वेळ भूक लागत नाही त्यामुळे डाएटिंगसाठीही मशरूम खाल्ला जातो. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात मशरूम खाता येतो. या सर्व कारणाने बाजारात मशरूम खूप लोकप्रिय आहे. सध्या त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
भारतीयांच्या मशरूमच्या याच मागणीला ओळखून काही शेतकऱ्यांनी एक वेगळा प्रयोग म्हणून मशरूमची शेती करायला घेतली. त्यापैकी एक शेतकरी म्हणजे पंजाबचे संजीव सिंह. १९९२ मध्ये पारंपरिक पिकांकडे न वळता संजीव सिंह यांनी मशरूमची शेती करायला घेतली. दुरदर्शनवरच्या 'मेरा पिंड, मेरा किसान' या कार्यक्रमातून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी वयाच्या २५व्या वर्षी तांडा गावातून मशरूमच्या शेतीची सुरूवात केली. आता ते मशरूममधून दरवर्षी तब्बल १.२५ कोटी कमवतात. त्यांचे काम बऱ्याच जणांना प्रेरणा देत आहे. आज त्यांच्या प्रेरणादायी कामाबद्दल वाचूया.



