ना उम्र की सीमा हो, ना जन्मों का हो बंधन. या पलीकडे जाऊन सीमेचेही बंधन झुगारलेल्या प्रेमकहाण्या तुम्ही पाहिल्या-वाचल्या असतील. सातासमुद्रापार लग्नाच्या गाठी जमण्याच्या गोष्टी याचाच पुरावा असतात. सध्या तंत्रज्ञानामुळे तर प्रेम कुठेही आणि कुणाशीही होऊ शकते. पण आज आम्ही जी लवस्टोरी सांगणार आहोत ती फक्त सातासमुद्रापार झालेल्या प्रेमाची नसून त्यापलीकडे देखील ही गोष्ट भन्नाट आहे.
समुद्रात बुडता बुडता ती प्रेमात पडली? काय आहे भारतीय मुलगी आणि नेदरलँड्सच्या मुलाची प्रेमकथा !!


गोष्ट सुरू होते फेब्रुवारी २०१९ पासून. लखनऊची नुपूर गुप्ता योगा शिकण्यासाठी २ आठवड्यांकरिता गोवा गेलेली होती. एके दिवशी नुपुरने समुद्रात पोहण्याचा बेत आखला. पोहण्याच्या नादात ती थोडी जास्तच समुद्राच्या आत गेली. योगायोगाने जोरजोरात लाटा धडकायला लागल्या. तिने लाख प्रयत्न करूनही तो किनाऱ्याकडे येऊ शकत नव्हती. आता तिची हिंमत संपत होती. तेवढ्यात तिला एक माणूस पोहून तिच्याकडे येताना दिसला. आता बॉलीवूडचे एवढे सिनेमे पाहिल्यावर पुढे काय घडले हे तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही. पण यात विशेष गोष्ट अशी की ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे.

ती व्यक्ती होती मूळ नेदरलँडचा ऍटलिया बोसन्याक. एवढ्या आत समुद्रात बुडत असलेल्या नुपुरला वाचवणे सोपे नव्हते. पण त्याने आटोकाट प्रयत्न करून तिचा जिव वाचवला. बाहेर येईपर्यंत तो मात्र रक्तबंबाळ झाला होता. नुपूरला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात खडकांना ठोकला जाऊन त्याच्या पूर्ण अंगातून रक्त वाहत होते. नुपुरने त्याच्यावर प्रथमोपचार केले आणि चॉकलेट आईस्क्रीम खाऊ घातली. आता त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. एकमेकांशी बोलत असतानाच त्यांच्या हृदयात प्रेमाची घंटी वाजायला सुरुवात झाली होती.
परत आपापल्या मुक्कामी जायची वेळ आली तरी त्यांनी एकमेकांसाठी गोव्यातला मुक्काम वाढवण्याचे ठरवले. एका आठवड्याने नुपूर केरळला गेली तर ऍटलिया नेदरलँडला परतला. पण त्यांचे बोलणे मात्र सुरू होते. आता त्यांनी परत भेटण्याचे ठरवले. जागा ठरली दुबई!!! दुबईला भेटल्यावर अजून एक फिल्मी ट्विस्ट त्यांच्या नात्यात आला. नुपूरची आई अचानक आजारी पडली. नुपुरला आता परत यावे लागणार होते. ऍटलिया परत तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. तो देखील नुपुरसोबत तिच्या आईची देखभाल करण्यासाठी तिच्या सोबत गेला.

भारतात आल्यावर ते दोघे मग ताज महाल फिरण्यासाठी गेले. ताजमहालला गेल्यावर ऍटलियाने गुडघ्यावर बसून तिला लग्नासाठी प्रपोज केले. अर्थातच नुपूरने हो म्हणत त्यांच्या प्रेमाला अधिकृत स्वरूप दिले. २०१९ पासूनच नुपूर डच विजा घेऊन नेदरलँडला ऍटलियासोबत राहत होती. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांनी लग्नगाठ देखील बांधली आहे. दोन्ही प्रेमीयुगुल सुखाने संसार करत आहेत.
एखाद्या बॉलिवूड सिनेमाला देखील लाजवेल अशी ही गोष्ट आहे. नाही का?
लेखिका: शीतल दरंदळे
आणखी वाचा: