नेपाळच्या या मधाला ‘मॅड हनी’ का म्हणतात ? वाचा या दुर्मिळ मधाची कहाणी !!

नेपाळच्या या मधाला ‘मॅड हनी’ का म्हणतात ? वाचा या दुर्मिळ मधाची कहाणी !!

नेपाळ हा देश त्याला लाभलेल्या निसर्गसौंदर्यामुळे समृद्ध आहे. हिमालयासारख्या पर्वत रंगांनी समृद्ध असा हा देश या पर्वतरांगांमध्ये असलेल्या एका खास खजिन्यासाठी ओळखला जातो. हा खजिना जेवढा अनमोल आहे तेवढाच तो मिळवण्यात धोकाही आहे. याचबद्दल आज विशेष माहिती जाणून घेऊया.

स्रोत

‘एपिस डोरसेट लॅबोरिओ’ नावाची हिमालयात आढळणारी मधमाशी ही जगातील सर्वात मोठी मधमाशी आहे. ही मधमाशी भूतान, नेपाळ, आणि हिमालयाला लागून असलेल्या चीनच्या भागात उंच पर्वतरांगांमध्ये आणि त्याच बरोबर तुर्कस्तानच्या भागातही आढळते. ही मधमाशी ज्या फुलाचं रस पिऊन मध तयार करते, ते फुल थोडं वेगळं आहे मंडळी. या फुलाचं नाव आहे ‘रोडोडेंड्रॉन फ्लॉवर’. याला हिंदीत ‘बुरांस फुल’ म्हटलं जातं.

या फुलांचा रस हा काही अंमली घटकांनी युक्त असतो. त्यामुळे यापासून तयार झालेल्या मधातही अंमलीद्रव्याचा प्रभाव राहतो. यातूनच तयार होतो एक वेगळ्या प्रकारचं रसायन असलेला मध. हे मध खाल्यानंतर मेंदूला मिळणाऱ्या उत्तेजनेतून या मध हजारो वर्षांपूर्वी ‘मॅड हनी’ नाव पडलं आहे.

 

नेपाळमधली ‘मॅड हनी’

स्रोत

नेपाळच्या पूर्वेकडील भागात आढळणाऱ्या या मधमाशा आपले पोळे पर्वताच्या उंच कडांवर बनवतात. त्यांच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत धोकादायक असतं. पण या मधाची मागणी आणि त्याचं वेगळेपण बघता स्थानिक कुलुंग जमातीचे लोक हे काम अनेक वर्षांपासून करत आहेत. या मधापर्यंत पोहोचण्यासाठी हे लोक फक्त दोरी आणि बांबूचा वापर करतात. मधमाश्यांना पोळ्यातून बाहेर काढण्यासाठी गवताला आग लावून धूर केला जातो. आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी त्यांच्याकडे फक्त चेहऱ्यावर एक कापड गुंडाळलेलं असतं. यावेळी त्यांचा सगळा भार या पर्वतावरून खाली सोडलेल्या दोरीवर असतो. फोटोमध्ये तुम्ही याचं उदाहरण पाहू शकता.

स्रोत

काळाच्या ओघात मध मिळवण्याचा हा जीवघेणा व्यवसाय आता जवळ जवळ संपुष्टात आलेला आहे. हे काम करणारे शेवटचे कुलुंग ‘मौली धान’ यांच्यावर ‘नॅशनल जिओग्राफी' डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली होती. जून २०१७ मध्ये या डॉक्युमेंट्रीच्या निमित्ताने त्यांनी मध मिळवण्यासाठी पुन्हा एकदा जीवाची बाजी लावली. ही त्यांची शेवटची वेळ होती कारण त्यांना आता या कामातून निवृत्त व्हायचं आहे. यात जीव जाण्याचा धोका असला तरी गरिबीमुळे आपल्याला हे काम करणं भाग होतं असं मौली धान म्हणाले.

मॅड हनीचे काही औषधी फायदेसुद्धा असल्याने बाजारात त्याची मोठी मागणी आहे. कुलुंग जमातीबरोबरच ‘गुरुंग’ जमातीचे लोकही या कामात पारंगत आहेत. या मधाबद्दल अगदी ग्रीकांच्या काळापासूनचे उल्लेख आढळतात. यात असलेल्या अंमली घटकांमुळे हे मध अनेकांना भुरळ घालत आहे, पण त्याला मिळवणं किती कठीण आहे हे तुम्ही खालील व्हिडीओमध्ये बघू शकता.