चेन्नई पासून ५५ किलोमीटरवर असलेल्या महाबलीपुरम मध्ये एक भला मोठा दगड एका जागी ठाण मांडून बसला आहे. हा दगड अजब पद्धतीने आपला तोल सावरून उभा आहे. असं म्हणतात की इंग्रजांच्या काळात या दगडाला हलवण्यासाठी ७ हत्तींना कामाला लावलं होतं, पण हा दगड एक इंच सुद्धा हलला नाही. असं काय आहे या दगडात ?
चला आज जाणून घेऊया भारतातल्या या अनोख्या आश्चर्या बद्दल.

१९०८ साली मद्रासचे गव्हर्नर आर्थर यांच्या पाहण्यात हा ५ मीटर रुंद आणि २० फूट उंच दगड आला. त्यांना वाटलं की हा दगड ज्या प्रकारे उभा आहे त्यानुसार हा कधीही घरंगळत जाऊन लोकांचा जीव घेऊ शकतो. त्यामुळे त्यांनी हा दगड तिथून हटवण्यासाठी ७ हत्तींची मदत घेतली. पण दगडाला ते हत्ती एक इंचही हलवू शकले नाहीत. या घटनेनंतर या दगडाची सर्वत्र चर्चा सुरु झाली.
स्थानिक लोक याला ‘वान इरई कल’ म्हणजे ‘आकाशातल्या देवाचा दगड’ म्हणून संबोधतात. पण भारतभर आणि भारताच्या बाहेरही याला ‘कृष्णाच्या लोण्याचा गोळा’ म्हणून ओळखलं जातं. असं म्हणतात की कृष्णाने हा लोण्याचा गोळा आपल्या बाल्यावस्थेत इथे सोडला होता.

या दंतकथेबद्दल शंका असल्या तरी हा दगड ज्या प्रकारे उभा आहे त्यातून तो सामान्य माणसांना आणि थेट वैज्ञानिकांनाही आश्चर्याचा धक्का देत आहे. असं म्हणतात की हा दगड गेल्या १२०० वर्षापासून या जागी उभा आहे. याचं वजन तब्बल २५० टन आहे. अनेकांनी याला धक्का देऊन पडण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही.
हा दगड वर्षानुवर्ष एवढा स्थिर आणि तोल राखून कसा उभा आहे हे एक न सुटलेलं कोडं आहे. या कोड्यामुलेच कदाचित या दगडाला दंतकथेचं रूप आलेलं असावं...
