मानवी शरीरात अवयव प्रत्यारोपण करणे हे काही नवे राहिले नाही. प्रत्यारोपण म्हणजे एका माणसाचा खराब झालेला अवयव काढून त्या ठिकाणी नवा अवयव बसवणे. किडनी प्रत्यारोपण आपण बऱ्याचदा ऐकले असेलच. तसेच हृदय प्रत्यारोपण ही करतात. एका माणसाचे हृदय काढून दुसऱ्याला शस्त्रक्रिया करून बसवतात. पण तुम्ही डुकराचे हृदय प्रत्यारोपण केलेले ऐकले आहे का? म्हणजे डुकराचे हृदय माणसाच्या आत रोपण करण्यात आले होते. हे अमेरिकेत घडले होते. पुढे त्या माणसाचे काय झाले याविषयी माहिती करून घेऊयात.
दोन महिन्यांपूर्वी म्हणजे ७ जानेवारी २०२२ रोजी जगात प्रथमच डुकराचे हृदय माणसाच्या आत रोपण करण्यात आले होते. हे धाडस अमेरिकेच्या डॉक्टरांनी केले. त्यांनी ५७ वर्षीय डेव्हिड बेनेटच्या शरीरात डुकराचे हृदय प्रत्यार्पण केले. हा असा पहिला प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर जगभरात या ऑपरेशनची जोरदार चर्चा झाली. परंतु दोन महिन्यांनी डेव्हिड यांचा मृत्यू झाला आहे.
त्यांच्या मृत्यनंतर डेव्हिड बेनेटच्या मुलाने सांगितले की त्यांना हा प्रयोग यशस्वी होईल की नाही याबद्दल हमी देण्यात आली नव्हती. तरीही त्यांनी ते धाडस केले. ऑपरेशनच्या वेळी रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये बरीच चर्चा झाली. ऑपरेशन झाल्यावर बेनेट हळूहळू बरे होत आहेत. असेही म्हणले होते. गेल्या महिन्यात हॉस्पिटलच्या फिजिओथेरपिस्टसोबत डेव्हिडचा एक व्हिडिओही प्रसिद्ध झाला होता, ज्यामध्ये तो पूर्णपणे निरोगी दिसत होता. पण काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि त्यांचा मृत्यू झाला.
जगभरात दररोज अवयव प्रत्यारोपणाअभावी शेकडो लोकांचा मृत्यू होतो. वैद्यकीय जगतात हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात होते. तरीही काही गोष्टी वैद्यक शास्त्राला अजूनतरी शक्य नाहीत असेच दिसते.
शीतल दरंदळे
