त्याचं असं झालं, २०१३ मध्ये अमेरिकेतील बेंजामिन कॅरिथर्स नावाच्या ग्राहकाला हे स्लोगन खोटी जाहिरात करत आहे, दिशाभूल करणारी माहिती देत आहे असं वाटलं. त्याच्या म्हणण्यानुसार २००२ पासून हे ड्रिंक पिऊनही त्याला पंख फुटले नव्हते! गमतीचा भाग सोडा; स्लोगनमध्ये म्हटल्याप्रमाणे या एनर्जी ड्रिंकमुळे माणसाला पंख फुटावेत अशी काही बेंजामिनची अपेक्षा नव्हती. हे वाक्य म्हणजे केवळ एक रूपक आहे, इतपत त्यालाही कळत होतं. त्याचं खरं म्हणणं वेगळंच होतं. त्याच्या मते आपल्या ड्रिंकमुळे ग्राहकाला भरपूर ऊर्जा मिळते हा कंपनीचा दावा खरा नव्हता. प्रत्यक्षात २५० मिलीलीटर ड्रिंकपासून मिळणारी ऊर्जा एक कप कॉफीपासून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षाही कमी होती. त्यामुळे त्याने या कंपनीला कोर्टात खेचलं. बेंजामिनचं हे म्हणणं न्यायाधीशांनाही पटलं. अशाप्रकारे अस्तित्वात नसलेल्या गोष्टी खोट्या दाखवून त्यांची जाहिरात करणं ही ग्राहकांची शुद्ध फसवणूक आहे, या बेंजामिनच्या म्हणण्याला न्यायालयाने दुजोरा दिला. केस बेंजामिनच्या बाजूने वळणार हे स्पष्ट झालं.
रेड बुलने उत्पादनांची जाहिरात करताना नेहमीच दर्जा आणि गुणवत्ता यावर भर दिला होता. बाजारात अनेक वस्तू केवळ किंमत कमी आहे म्हणून विकल्या जातात, म्हणजे त्यांची परवडणारी किंमत ग्राहकांसाठी आकर्षण ठरते. तसं रेड बुलच्या बाबतीत नव्हतं. त्यांच्या ड्रिंकचा सर्वोत्तम दर्जा हा त्यांच्यासाठी युएसपी होता. त्यामुळे रेड बुलने आपण दोषी असल्याचं मान्य केलं नाही. त्यांच्या मते बेंजामिन हा एकच ग्राहक असंतुष्ट होता आणि इथेच त्यांनी एक मोठी चूक केली. केवळ एक ग्राहक असमाधानी आहे म्हणून ग्राहकाला गृहित धरण्याची. कोणत्याही ब्रँडला बाजारपेठेतील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक ग्राहकाचा विचार करणं गरजेचं असतं आणि ग्राहक नेहमीच बरोबर असतो! नेमकं ह्याच गोष्टीकडे रेड बुलने दुर्लक्ष केलं आणि आपली जाहिरात फसवी असल्याचा इन्कार केला. दुसरीकडे रेड बुलने वाढीव खर्च आणि कोर्टकचेऱ्या टाळण्यासाठी सेटलमेंटची तयारी दाखवली, मात्र आपली जाहिरात फसवी आहे हे त्यांनी सातत्याने नाकारलं. २०१५ मध्ये न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ग्राहकाला भरपाई म्हणून कंपनीला १३ दशलक्ष डॉलर्स द्यावे लागले!