मृत्यू कुणाला कधी कुठे गाठेल सांगता येत नाही. अगदी आत्ता हसत खेळत बोलणारी व्यक्ती पुढच्या क्षणी इतिहासजमा होऊ शकते यावर कुणाचा विश्वास बसणार नसला तरी हे सत्य आहे. तुम्हीही अशा कित्येक घटना तुमच्या आजूबाजूला पहिल्या असतील. असंच काहीसं १९७२ साली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत घडलं होतं. एका रविवारी ते पोहण्यासाठी म्हणून समुद्र किनारी उतरले आणि समुद्र असा काही खवळला की पाहता पाहता ते समुद्रात बुडून गेले. तब्बल पंधरा ते वीस दिवस त्यांच्यासाठी समुद्रात शोधमोहीम सुरु होती. पण तरीही त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. जिवंत परत येण्याची तर शक्यता नव्हतीच, पण त्यांचा मृतदेहही आजवर हाती लागला नाही.ऑस्ट्रेलियाच्या या पंतप्रधानांचं नेमकं झालं तरी काय? हा प्रश्न आजही अनेकांना सतावतो. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा गायब होण्याचा हा किस्सा खास बोभाटाच्या वाचकांसाठी इथे देत आहे.
त्या दिवशी ज्या ज्या लोकांना या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता आले त्यांच्यासाठी तर हा धक्का इतका मोठा होता की, त्यातून त्यांना लवकर सावरणे कठीणच गेले. कोणत्याही एका सामान्य दिवसाप्रमाणे तोही एक सामान्य रविवारचा दिवस होता आणि तारीख होती १७ डिसेंबर, १९६७. ख्रिसमस तोंडावर आला होता आणि संपूर्ण देश ख्रिसमसच्या तयारीत गुंतलेला होता. ऑस्ट्रेलियाचे १७वे पंतप्रधान हॅरल्ड हॉल्ट त्या दिवशी चीव्हीयट बेटावर फिरत होते. हे बेट तसे तर खूप दुर्दैवी बेट म्हणून ओळखले जाते. सुमारे ८० वर्षांपूर्वी याच बेटावर एकाच वेळी ३५ जणांना जलसमाधी मिळाली होती. म्हणून याला अपशकुनी बेटही म्हटले जाते.







