जगात अशी अनेक विचित्र ठिकाणे आहेत, जिथे अफाट खजिना दडलेला आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या खजिन्यांबद्दल माहिती असूनही आजपर्यंत वैज्ञानिकांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य झालेले नाही. असाच एक खजिना मेक्सिको येथे क्रिस्टल केव्हमध्ये आहे. खजिना अश्यासाठी की या गुहेत महाकाय आकाराची स्फटिकं आहेत आणि ती तब्बल ५ लाख वर्षं जुनी आहेत. पण या गुहेत जाणे कोणालाही जवळजवळ अशक्य आहे. आज या विलक्षण क्रिस्टल केव्हबद्दल जाणून घेणार आहोत.
मेक्सिकोच्या सिएरा डी नायका पर्वताच्या जवळपास ९८४ फूट खाली एक गुहा आहे. तिथे अनेक मोठमोठ्या आकाराचे स्फटिक खांब आहेत. त्यामुळेच या गुहेला जायंट क्रिस्टल गुहा असे नाव पडले. २०००साली जेव्हा शास्त्रज्ञांना त्याच्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा ते चक्रावून गेले कारण उत्खननादरम्यान पर्वताखाली असे काही पहिल्यांदा सापडले होते. औद्योगिक पॅनल्ससाठी काम करणाऱ्या दोन भावांनी या खाणीचा शोध लावला होता. ते माऊंट नायकाच्या खाली बोगद्याचे खोदकाम करत होते आणि तेव्हा चुकून खाणीला धडकले. त्यांना जेव्हा स्फटिकांचे खांब दिसले तेव्हा ते चकित झाले.
हे स्फटिक प्रत्यक्षात जिप्समचे बनलेले आहेत. जिप्सम हे एक प्रकारचे खनिज आहे, ते साधारणत: कागद आणि कापड उद्योगात फिलर म्हणून वापरले जाते. सिमेंट बनवण्यासाठीही त्याचा वापर होतो. विशेष म्हणजे हे जिप्सम स्फटिकांचे खांब ५,००,००० वर्षांहून अधिक जुने आहेत आहे. यापैकी अनेक खांब सहज चालता येण्याइतपत मोठे आहेत. कारण ते अनेक वर्षे पृथ्वीखाली गाडले गेले होते. पण या गुहेत कोणालाही जाता येते का? तर नाही!

