सामान्य माणसाच्या हातात काय आहे?’ असं म्हणून नेहमीच सामान्य माणसाच्या क्षमतेला, ताकदीला दुर्लक्षित केले जाते. पण मनात आणले तर सामान्य माणूसही आजूबाजूच्या परिस्थितीत काही चांगला बदल घडवून आणू शकतो. यासाठी खास काही न करता आपले आहे तेच काम वेगळ्या पद्धतीने केले तरी हे होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल पण नेमकं कसं? तर या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचवा लागेल.
सुरंजन कर्माकर हा बेंगालच्या लिलूहा गावाचा एक सामान्य रिक्षाचालक. रिक्षाचालकांशी लोक कशी घासाघीस करून कमी पैशात आपल्याला इच्छित ठिकाणी पोहोचवण्यासाठी हुज्जत घालतात हे तुम्ही अनेकदा पहिले असेल किंवा कधी कधी तुम्हीही अशाप्रकारचं बार्गेनिंग केले असेल. तर या पद्धतीलाच फाटा देण्यासाठी सुरंजनने एक भन्नाट कल्पना शोधून काढली. सुरंजन इ-रिक्षा चालवतो आणि त्याच्या या रिक्षातून तो तुम्हाला फुकटात सैर करवून आणण्याचीही सूट देतो, पण कधी? जर तुम्ही त्याने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तर...!
सुरंजन नावाच्या या अवलियाची जगाशी ओळख झाली ती संकलन सरकार नावाच्या एका फेसबुक वापरकर्त्यामुळे. काही कारणाने संकलन आपल्या पत्नीसह लीलुहा गावी गेले होते. गावातून फिरण्यासाठी त्यांनी सुरंजनची टोटो (बॅटरीवर चालणारी रिक्षा) निवडली. रिक्षात बसता क्षणीच सुरंजनने त्याच्यासमोर आपली ही फ्री सफारीची भन्नाट ऑफर ठेवली. फ्री म्हटले की काही तरी गोलमाल असणारच अशी आपल्या सर्वांचीच कल्पना एव्हाना दृढ झाली आहे. संकलन यांनाही सुरुवातीला तसच काहीसं वाटलं. हा काहीही उलटसुलट प्रश्न विचारेल आणि आपण अडकलो की नेमके भाडे वाढवून मागेल.

