टेलरचा जन्म ८सप्टेंबर १८०८ चा. ब्रिटनमध्ये लिव्हरपूल परिसरात जन्मलेला मेडोज टेलर वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी आपला देश आणि कुटुंब सोडून एकटाच भारतात आला. एप्रिल १८२४ मध्ये जेव्हा त्याने ब्रिटन सोडले तेव्हा बॅक्सटर नावाच्या मुंबईतील श्रीमंत उद्योगात कारकुनाची व सहाय्यकाची नोकरी करायला आपण चाललोय इतकेच त्याच्या डोक्यात होते.त्या काळात त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने वयाच्या पंधराव्या वर्षी तो लिव्हरपूलजवळ एक जुजबी नोकरी करत होता. त्या दरम्यान मुंबईच्या बॅक्सटर कंपनीचा मालक इंग्लंडला काही कामासाठी आला होता.मेडोज टेलरच्या वडिलांचा बॅक्सटर कंपनीच्या मालकाशी परिचय होता. त्यांची भेट झाल्यावर बोलता बोलता बॅक्सटरच्या मालकाने १५ वर्षाच्या मेडोज टेलरला सहाय्यकाची कारकुनी नोकरी देऊ केली.आठ वर्षे झाल्यावर धंद्यात भागीदार करून घेऊ असेही सांगितले.त्या भेटीत तो मालक खर्चाची उधळपट्टी करताना पाहिल्यावर त्याचा धंदा चांगला मोठा असावा अशी मेडोजच्या वडिलांची समजूत झाली, आणि मेडोजला साता समुद्रापार नोकरीला पाठवायला ते तयार झाले.
सहा महिने बोटीचा प्रवास करून मेडोज टेलर मुंबईत आला खरा, पण मुंबईत आल्यावर बॅक्सटर कंपनी म्हणजे फार मोठा उद्योग नसून एक किरकोळ दुकान असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्या दुकानात आपल्याला कसलेही भवितव्य नाही हे लक्षात आल्यावर त्याने बॅकस्टरला पर्याय शोधायला सुरुवात केली. त्याच्या आईचे एक नातेवाईक त्यावेळी मुंबईत राहत. ते ईस्ट इंडिया कंपनीत मोठ्या पदावर होते. पण मेडोजला ईस्ट इंडिया कंपनीत चिकटवणे त्यांना शक्य नव्हते.कारण कंपनीतल्या छोट्या छोट्या नोकन्याही इंग्लंडच्या मंजुरीशिवाय दिल्या जात नसत. किशोरवयीन मेडोजबद्दल त्यांना आत्मियता निर्माण झाली आणि हैदराबादच्या निजामाच्या सेनादलात सैनिक म्हणून त्यांनी मेडोजला नोकरी मिळवून दिली.

