सामन्यातील असामान्य - भाग ५: पेन्शनच्या पैशांतून रस्त्यावरचे खड्डे बुजवणारे आजोबा !!

लिस्टिकल
सामन्यातील असामान्य - भाग ५: पेन्शनच्या पैशांतून रस्त्यावरचे खड्डे बुजवणारे आजोबा !!

भारतात उपचाराची गरज फक्त माणसांना नाहीतर रस्त्यांना देखील असते. रस्त्यांवरील खड्डयांना बघून वेळोवेळी ही गोष्ट जाणवत असते. खरंतर रस्त्यांवरील खड्डे बुजवणे हे सरकारी काम असते. पण एका निवृत्त इंजिनियरने खड्डे बुजवणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवले. त्याचीच ही गोष्ट...

आंध्र प्रदेशातील गंगाधर कत्नम हे ३५ वर्षे रेल्वेत इंजिनियर म्हणून कार्यरत होते. निवृत्त झाल्यापासून आजवर त्यांनी तब्बल ११२४ खड्डे भरले आहेत. याच कारणासाठी त्यांना रस्त्याचा डॉक्टर म्हणून देखील ओळखले जाते. 

गंगाधर रेल्वेतून निवृत्त झाल्यावर आपल्या मुलाकडे अमेरिकेत निघून गेले होते. सहसा निवृत्त झाल्यावर अनेक लोक आरामाचे आयुष्य जगावे या हेतूने आपल्या मुले नातवंडांच्या सानिध्यात जातात. पण या सरांना मात्र स्वस्थ बसायचे नव्हते.

एके दिवशी त्यांचा रस्त्यांवरच्या खड्यांमुळे एक अपघात बघितला, त्यांनी अभ्यास केल्यावर लक्षात आले की खड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. त्यांना आता पुढील जीवन कुठल्या कामासाठी समर्पित करायचे याचे उत्तर सापडले होते. 

त्यांनी एकेक खड्डा बुजविण्यास सुरुवात केली. हळूहळू काही कॉलेजची मुले देखील त्यांच्या कामात सहभागी झाली.  त्यांच्या मुलाला जेव्हा त्यांच्या या कामाची माहिती झाली तेव्हा त्याने त्यांना वेबसाईट आणि फेसबुक पेज बनवून दिले. ज्यामुळे त्यांचे काम अधिक लोकांकडे पोहोचू लागले.

गंगाधर यांना सरकारी अधिकाऱ्यांनी आम्ही हे काम करू म्हणून सांगितले पण त्यांना सरकारी कामाचा अनुभव असल्याने त्यांनी हे काम सुरूच ठेवले. पुढे मग त्यांना सरकारकडून खड्डे बुजबिण्याची सामग्री मिळू लागली. 

गंगाधर यांनी हळूहळू करत हजार पेक्षा जास्त खड्डे एकट्याने बुजवले. यामुळे अनेक अपघात होण्यापासून वाचले आहेत. या कामासाठी कुणी आर्थिक मदत देऊ केली तर ते नाकारतात. जर तुम्हाला मला मदत करायची असेल तर माझ्यासोबत श्रमदान करा असा त्यांचा सल्ला असतो.

गंगाधर कत्नम यांनी छोटेसे काम आपल्या निवृत्ती नंतर सुरू केले, पण यामुळे अनेक जीव वाचले तसेच खड्यांमुळे होणारा त्रास वाचू शकला. म्हटले तर छोटी पण मोठा बदल घडवू शकणारी ही गोष्ट आहे. समाजातील लोकांनी असेच स्वतःच्या मर्जीने छोटे छोटे कामे करायला घेतली तर समाज बदलायला वेळ लागणार नाही.