शाळेत असताना मी पंतप्रधान झालो तर, मी मंगळावर गेलो तर.. असे निबंध लिहायला असायचे. तेव्हा "मी एखाद्या देशाचा मालक झालो तर" हा विषय दिला नसला तरी आता प्रत्यक्ष आयुष्यात ही संधी तुम्हांला मिळू शकते. कोणता आहे हा देश? आणि आपण कसे त्याचे मालक होणार अशा असंख्य प्रश्नांनी आता तुमच्या मनात गर्दी केली असेल. हा लेख वाचल्यानंतर त्याची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळतील.
बाजारात विकायला आलेल्या या देशाचे नाव आहे हट रिव्हर. तसे तर हे नाव पूर्वी कधी तुमच्या ऐकण्यात आले असण्याची शक्यता कमीच आहे. कारण ऑस्ट्रेलियाचाच एक भाग असणारा हा प्रदेश पूर्वी एक स्वतंत्र देश होता. म्हणजे त्या प्रदेशाच्या मालकांनी स्वतःपुरते तरी तसे घोषित केले होते. जागतिक पातळीवर कुणीही या प्रदेशाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली नसली आणि ऑस्ट्रेलियानेसुद्धा त्यांचे स्वातंत्र्य मान्य केले नसले तरी, या देशाने स्वतःचे स्वतंत्र चलन आणि स्टँपदेखील अंमलात आणला होता. ऑस्ट्रेलियन डॉलर आणि हट रिव्हर डॉलर दोन्हींची किंमत समानच होती. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा देश पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियामध्ये विलीन झाला.


