जगभरात अनेक रत्ने आहेत, पण हिऱ्याचे मूल्य सगळ्यात जास्त आहे. हिऱ्यापेक्षा मौल्यवान आणि आकर्षक रत्न कुठेही नसेल. म्हणून दागिन्यात एखादा तरी हिऱ्याचा खडा असावा असे अनेकांचे स्वप्न असते. हे हिरे जेव्हा खाणीत सापडतात तेव्हा सगळ्यांचे डोळे दिपून जातात. रशियामध्ये नुकताच असा अत्यंत दुर्मिळ प्रकारचा हिरा सापडला आहे. या हिऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे एकात एक दडलेले असे दोन हिरे आहेत. असा हिरा इतिहासात पहिल्यांदाच सापडला आहे असं मानलं जातं.
रशियामध्ये या दुर्मिळ हिऱ्याला मात्र्योष्का असे नाव ठेवले आहे. खरंतर मात्र्योष्का म्हणजे एकात एक बसणारी पारंपरिक रशियन बाहुली. या मात्र्योष्का एकात एक अशा उतरत्या क्रमाने ठेवल्या असतात. हा हिरा किती जुना आहे याचा अंदाज लावताना संशोधक असे म्हणतात की हा ८०० कोटी वर्ष जुना असू शकतो. या असामान्य हिऱ्याची किंमत किती असू शकते हेही अजून स्पष्ट नाही.





