आपला मोबाईल नंबर १३ डिजीटचा होणार आहे का ? वाचा याबद्दल महत्वाची माहिती !!

आपला मोबाईल नंबर १३ डिजीटचा होणार आहे का ? वाचा याबद्दल महत्वाची माहिती !!

आपला फोन नंबर १० वरून १३ डिजीट चा होणार ही अफवा सध्या सोशल मिडीयावर पसरली आहे. ही खबर आल्यानंतर लोकांमध्ये मोठी खळबळ माजली. १ जुलै पासून हा बदल होणार असल्याचं बोललं जात होतं. याबद्दल नुकतीच आलेली माहिती आपल्या सगळ्यांना दिलासा देणारी आहे.

मंडळी, आपला मोबाईल नंबर १३ डिजीटचा झाला तर आपण चीनला मागे सोडून जगातील सर्वात मोठा मोबाईल नंबर असलेला देश होऊ. पण याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीयेत, कारण भारताच्या दूरसंचार खात्याने १३ डिजीट नंबरच्या अफवांबद्दल सांगताना म्हटलंय की, हा बदल फक्त “मशीन टू मशीन” (M2M) नंबरच्या बाबतीत होणार आहे. याचा परिणाम तुमच्या आमच्या मोबाईल नंबरवर होणार नाही.
म्हणजे आपला नंबर आहे तसाच राहणार.

काय आहे ‘मशीन टू मशीन’ सीम कार्ड ?

स्रोत

‘मशीन टू मशीन’ सीम कार्ड हा यंत्र आणि उपकरणातील संपर्कासाठी वापरला जातो. उपकरणांना इंटरनेटला जोडण्यासाठी मशीन टू मशीन सीम कार्ड गरजेचं असतं. अश्या कार्डचा वापर मोठ्या प्रमाणातील नेटवर्क कनेक्टीव्हिटीसाठी केला जातो. या वेगळ्या प्रकारच्या सिमकार्डला सुद्धा आपल्या मोबाईल सारखाच १० डिजीटचा नंबर असतो. या नंबरच्या आधारे मशीन टू मशीन संपर्क होत असतो. या मशीन्स कोणत्या याचं उदाहरण द्यायचं झालं तर, यात विमान, कार, ट्रॅफिक सिग्नल, सप्लाय चैन अश्या उपकरणांचा समावेश होतो.

तर, अश्या मशीन टू मशीन सीम कार्डच्या नंबर मध्ये बदल होऊन ते १३ डिजीट पर्यंत वाढणार आहेत. याची प्रक्रिया १ जुलै पासून सुरु होणार असून १ ऑक्टोबर पासून १० डिजीटचं रुपांतर १३ डिजीटमध्ये होईल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

शेवटी काय तर तुम्हा आम्हाला नंबर बदलणार म्हणून टेन्शन घेण्याचं कारण नाय.