वयाच्या ६६ व्या वर्षी हा पठ्ठ्या लग्न करतोय, तेही दुसऱ्या-तिसऱ्यांदा नाही, तर चक्क २७ व्यांदा!! आणि तेही प्रेमासाठी नाही, तर फक्त पैसे लुबाडण्यासाठी!! या आधुनिक लखोबा लोखंडेचा कारनामा वाचला तर अनेकांना चीड येईल. हा आहे ओडीसाचा रमेश कुमार स्वेन.. या पठ्ठ्याने गेल्या चार वर्षांत खोट्या बहाण्याने दहा वेगवेगळ्या राज्यातील २७ महिलांशी लग्न केले आणि महिलांना चांगलेच गंडवले. याला पोलिसांनी नुकतीच अटक तर केली आहे. पण या वयात याने केलेले कारनामे वाचून पोलिसही हैराण झाले आहेत.
रमेश कुमार स्वेन याचे १९८२ साली लग्न झाले होते. त्याला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. त्याचे मुलगे चांगले डॉक्टर आहेत. पण घरातल्यांशी पटत नसल्याने तो वेगळा राहतो. रिकाम्या वेळेत एकट्या महिलांशी मैत्री करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे हा त्याचा धंदा. हेच करत २००२ मध्ये त्याने झारखंडमधल्या एका डॉक्टरशी लग्न केले. तिलाही याने फसवले. ती घाबरून गप्प राहिली. या लग्नापासूनही स्वेनला दोन मुले आहेत. याचे शिक्षण फक्त इयत्ता दहावी, पण बायकांना तो केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य शिक्षण आणि प्रशिक्षणाचा उपमहासंचालक डॉक्टर आहे म्हणून सांगत असे. लाल दिव्याच्या गाडीसोबत काढलेले फोटो पाठवत असे. त्यासाठी खोटी कागदपत्रेही सादर करत असे. त्यामुळे त्याच्यावर सहज विश्वास बसे. तसेच हा त्याच बायकांना हेरत असे ज्या एकट्या आहेत, साधारण वयाची ४० शी पार केलेली, घटस्फोटीत किंवा घरातल्यांपासून दूर राहणाऱ्या आहेत.
विशेष म्हणजे या सर्व स्त्रिया उच्चशिक्षित होत्या. त्यात काही डॉक्टर, सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि सरकारी अधिकारी देखील आहेत. या सगळ्यांकडून त्याने लाखो रुपये उकळले आहेत. दोन-तीन महिन्यांत त्याने सहा स्त्रियांशी लग्न केले. काही स्त्रियांना फसवणूक झाल्याचे कळूनदेखील लाजेखातर त्या गप्प बसल्या आणि त्यामुळेच याचे फावले.

