या टांझानियाच्या टिकटॉकरचा भारतीय राजदूतांनी सत्कार का केलाय कारण तर जाणून घ्या!!

या टांझानियाच्या टिकटॉकरचा भारतीय राजदूतांनी सत्कार का केलाय कारण तर जाणून घ्या!!

टांझानिया आणि भारत यांची ना संस्कृती जुळते, ना भाषा, ना इतर कुठली गोष्ट सारखी आहे. पण या देशातील एक बहीण भाऊ मात्र भारतीयांचे चांगलेच लाडके झाले आहेत. किली पॉल आणि निमा पॉल या भाऊ बहिणींचे इन्स्टाग्रामवर व्हिडिओ आहेत ज्यांनी पाहिले, त्यांना ही जोडगोळी आवडलेली दिसते.

या देशातील लोकांच्या हिंदी गावीही नाही. पण हे दोन्ही भाऊ बहीण मस्तपैकी हिंदी गाण्यांवर टिकटॉक व्हिडिओ बनवत असतात. लीप सिंक व्हिडिओ बनवून हे लोक त्यांच्या देशात कमी आणि भारतात जास्त लोकप्रिय झाले आहेत. शेरशाह सिनेमातील राता लंबिया या गाण्यावर बनवलेला व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता. एवढेच नाही, तर कच्चा बदाम या ट्रेंडिंग गाण्यावरही त्यांनी व्हिडिओ केला होता.

काही दिवसांपूर्वी टीप टीप बरसा पाणी गाण्यावर त्यांनी केलेला लीप सिंक व्हिडिओ वायरल झाला आणि त्यांना भारतात मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळू लागले. आज त्यांचे इन्स्टाग्रामवरव २२ लाख फॉलोअर्स झाले आहेत. अनेकांच्या स्टोरीवर हे लोक अधूनमधून झळकत असतात. त्यांना आयुष्यमान खुराणा, रिचा चढ्ढा, गुल पनाग असे सेलेब्रिटी फॉलो करत असतात.

इन्स्टाग्रामवर स्टार होणे इथपर्यंत ठीक होते. पण या किली पॉल भावाचा भारताकडून थेट सत्कार करण्यात आला आहे. टांझानिया येथील भारतीय दूतावासातील अधिकारी बिनय प्रधान यांनी त्याचा सत्कार केला आहे. या सत्कार केल्याचा फोटो लगोलग सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे.

आपल्या पारंपरिक पोशाखात हिंदी गाण्यांवर व्हिडिओ बनवताना त्यांचे एक्सप्रेशन बघून यांना चांगली हिंदी येत असावी असे वाटल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर कुणीही स्टार झाले म्हणजे त्याची ट्रोलिंगही ठरलेली असते. पण याला हे पॉल बहीण भाऊ अपवाद आहेत, त्यांना सहसा प्रेमच मिळत असते. भारताने पॉलचा सत्कार केल्यावर देखील ही कृती कशी अतिशय योग्य आहे असेच मत नेटकरी व्यक्त करताना दिसत आहेत.

उदय पाटील