गावात शिरणाऱ्या वानरांचा उच्छाद ही काही आता नवी बातमी राहिली नाही, पण बीड जिल्ह्यातील लवूळ या गावात या वानरांमुळे एक नवीच समस्या निर्माण झाली आहे. लवूळ गावातील या वानरांनी गावातील कुत्र्यांविरोधात चक्क टोळीयुद्ध सुरू केले आहे. बहुतेकदा कुत्र्याच्या भुंकण्याने पळून जाणारी वानरं आज कुत्र्यांच्या जीवावर टपली आहेत.
तर घटना अशी घडली की, या गावातल्या कुत्र्यांनी माकडाचं एक पिल्लू मारून टाकलं. आपल्या जमातीतील एका छोट्या पिल्लाला कुत्र्यांनी असं मारून टाकावं? हे वानरांना अजिबात सहन झालं नाही आणि झालं सगळी वानरसेना पेटून उठली. आता या सेनेत तशी दोनच वानरं आहेत बरं, पण या दोन वानरांनी गावातील शंभरहून अधिक कुत्र्याची पिल्लं मारली आहेत. कुत्र्याचं पिल्लू दिसलं की ही वानरं लगेच त्याला उचलतात, एखाद्या उंच झाडाच्या शेंड्यावर किंवा इमारतीच्या टेरेसवर घेऊन जातात आणि तिथून फेकून देतात. या गावातील नागरिकही वानर आणि कुत्र्यांच्या या टोळीयुद्धामुळं गावकरी मात्र भयानक त्रस्त झाले आहेत. कारण कुठेही कुत्र्याचं पिल्लू दिसलं की लगेच ही वानरं तिथं घुसतात आणि ते पिल्लू उचलून नेतात. आता हे सगळं व्हायरल झालं आहे ते गावकऱ्यांच्या सांगण्या वरून, माकडं पिल्लाना उचलून छतावर जातात तिथून कदाचित पिल्लं खाली पडत असतील अशीही एक शक्यता आहे.
छतावर अडकलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्यासाठी म्हणून एक गावकरी छतावर चढले. तिथे लगेच हे वानर आले आणि लगेच त्या माणसाच्या अंगावर झेपावले. वानराच्या तावडीतून वाचण्याच्या प्रयत्नात ते छतावरून पडले खाली पडले आणि त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले.
अडीचशे कुत्र्याची पिल्लं मारूनही त्यांची सूड भावना शमलेली नाही. कुत्र्याच्या पिल्लांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे नागरिकही आता त्यांच्या रडारवर आले आहेत.
गावकऱ्यांनी या वानरांची चांगलीच धास्ती घेतली आहे. या वानरांना वनअधिकाऱ्यांनी पकडून न्यावे म्हणून गावकऱ्यांनी तहसीलदार कार्यालय आणि बीडीओ ऑफिसमधेही अर्ज केले आहेत. पण प्रशासनाने अजून तरी हे प्रकरण म्हणावे तितक्या गांभीर्याने घेतलेले नाही. दिवसाढवळ्या गावकऱ्यांना घराची दारे-खिडक्या बंद करून बसावे लागत आहे. गावकऱ्यांनी घरापुढील चौक, अंगण, मागचे अंगण सगळे काही बंदिस्त करून घेतले आहे. ज्या रस्त्यावर वानरे दिसतील गावकरी त्या रस्त्याने जाण्याऐवजी आपला रस्ताच बदलतात.
आजवर माणसांच्या भांडणात कितीतरी प्राण्यांना आपला जीव गमावावा लागला असेल, आज प्राण्यांच्या युद्धाने माणसास जेरीस आणले आहे. लहान मुलांनाही ही वानरे त्रास देत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
एकीकडे लवूळ गावाचे ग्रामस्थ या टोळीयुद्धाने त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे नेटकऱ्यांना मीम बनवण्यासाठी चांगलाच विषय मिळाला आहे. कुत्रा आणि वानरांच्या या युद्धावरून सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे.
मीम्स बनवून काही हा प्रश्न सुटणार नाही. पण या वानरांपासून गावकऱ्यांची सुटका करण्यासाठी तुमच्याकडे काही नामी उपाय असेल तर नक्की शेअर करा.
मेघश्री श्रेष्ठी
