स्पर्धा परीक्षा : 'यशदा'मध्ये करा नागरी सेवा परीक्षेची तयारी !!

स्पर्धा परीक्षा : 'यशदा'मध्ये करा नागरी सेवा परीक्षेची तयारी !!

केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, यशदा, पुणे या महाराष्ट्र शासनाच्या शिखर परीक्षण संस्थेमध्ये २००६ पासून डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामधून आतापर्यंत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षी या केंद्रामार्फत ७० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा घेऊन प्रवेश दिला जातो. हे केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आदिवासी विकास विभाग आणि अल्पसंख्यांक विभाग व यशदा यांच्या आर्थिक साहाय्यातून चालवले जाते. 

स्रोत

सोयी-सुविधा

डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्रात निवड झालेल्या विध्यार्थ्यांसाठी मोफत निवास अभ्यासिका, ग्रंथालय, इंटरनेट टेस्ट सिरीज, शिकवणी, अभ्यास साहित्य आणि तज्ञांचे मार्गदर्शन तसेच प्रती महिना २५००/- शिष्यवृत्ती आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

 

प्रवेशासाठी पात्रता

कोणत्याही विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेले विद्यार्थी या केंद्राच्या प्रवेश परीक्षेसाठी बसू शकतात. यासाठी वयोमर्यादा २१ ते ३२ वर्षे असावी लागते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच वर्षे तर विशेष मागासवर्गीयांसाठी तीन वर्षांच्या वयामध्ये शिथिलक्षमता आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागतो.

 

प्रवेश परीक्षा

या केंद्रासाठी युपीएससी पूर्व परीक्षेच्या धर्तीवर प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये सामान्य अध्ययन पेपर-१ प्रश्न ५० गुण १०० हा एक पेपर असतो व सामान्य अध्ययन पेपर-२ सीसेंट प्रश्न ४० गुण १०० अशी २०० गुणांची ही परीक्षा असते. साधारणतः दोन तासाचा वेळ या परीक्षेसाठी असतो. या पूर्व परीक्षेची जाहिरात दर वर्षी साधारणतः सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातल्या काही प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये व यशदा संकेतस्थळावर www.yashada.org/abeb प्रकाशित होते. पूर्व परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेतली जाते. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवर्गनिहाय प्रवेश दिला जातो. जे विद्यार्थी यूपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतात, त्यांना पुढे येथे राहता येते. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होतो. त्यांच्या जागी बाहेरून महाराष्ट्रातील जे विद्यार्थी यूपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांना नियमानुसार मुख्य परिक्षेच्या तयारीसाठी प्रवेश दिला जातो.

 

स्रोत

प्रवर्गनिहाय जागा

डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवर्गनिहाय जागांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अनुसूचित जाती-३० जागा. यापैकी ६ जागा मुलींसाठी आणि १ जागा अपंगाकरीता राखीव आहे. अनुसूचित जमातीसाठी १२ जागा राखीव आहेत त्यापैकी २ जागा मुलींसाठी आहेत. त्यापैकी १ जागा अपंगांकरिता राखीव आहे. व्हीजे (ए) १ जागा, एनटी (बी) १ जागा, एनटी (सी) १ जागा, एनटी (डी) १ जागा, एसबीसी-१, ओबीसी-४ यापैकी मुलींसाठी १ जागा, खुला संवर्ग-९ पैकी २ जागा मुलींसाठी राखीव व १ जागा अपंगाकरीता राखीव. अल्पसंख्यांकांच्या १० जागांपैकी मुस्लीम-५ जागा. त्यापैकी १ जागा मुलींसाठी. ख्रिश्चन-१, बुद्धिस्ट-१, शाखा-१, पारशी-१, जैन-१ असा जागांचा तपशील आहे.  

 

प्रवेश परीक्षा केंद्र

या केंद्राची प्रवेशपूर्व परीक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ३६ केंद्रावर घेतली जाते. ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपाची असून, या परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धती आहे. परीक्षेसाठी ३७५ रुपये एवढे शुल्क असून, ते बँकेत चलनाद्वारे स्वीकारले जाते. या परीक्षेचे अर्ज व प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातात. या परीक्षेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी www.yashada.org/abeb/ या संकेतस्थळावर ०२०-२५६०८२०३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

लेखक : बबन जोगदंड

संशोधन अधिकारी, (प्रकाशन) यशदा, पुणे.

संपर्क : ०९८२३३३८२६६