पैसा नसणं ही जशी माणसाची अडचण असू शकते, तसंच गरजेपेक्षा जास्त पैसा असणं देखील अडचणीचं ठरू शकतं. मारिझिओ गुची या जगातल्या श्रीमंत, तरीही दुर्दैवी ठरलेल्या माणसाची ही कथा वाचल्यानंतर तुम्हालाही हे नक्कीच पटेल.
मरिझिओ गुची हा इटलीचा एक मोठा व्यावसायिक होता. मरिझिओला त्याचा व्यवसाय त्याच्या आजोबांकडून वारसाहक्काने मिळाला होता. त्याचे वडील रोडोल्फो गुची आणि आई सँड्रा रॅव्हेल यांनी आपल्या या एकुलत्या एक मुलाला अगदी राजकुमारासारखे वाढवले होते. २६ सप्टेंबर, १९४८ रोजी मारिझिओचा जन्म झाला. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मास आलेल्या मारिझिओला अभाव या शब्दाचा अर्थच माहीत नसावा. त्याचा जन्म जणू जगातील सर्व सुखे उपभोगण्यासाठीच झाला होता. त्याचे आजोबा ग्वाचो गुची यांनी १९२१ मध्ये इटलीतील गुची या प्रसिद्ध फॅशन ब्रँडची स्थापना केली. त्यांच्या कालावधीतच हा ब्रँड इटलीतील सर्वात मोठा फॅशन ब्रँड बनला होता. कपडे, चपला, लेदरच्या वस्तू असो की आणखी काही या गुची फॅशन हाऊसमध्ये सर्व काही एकाच ठिकाणी मिळत असे.
त्याचे वडील तर हॉलीवूडचे हिरो! अशा मुलाचे बालपण कसे गेले असेल याची फक्त कल्पनाच केलेली बरी. १९८३ साली रोडोल्फोचे निधन झाले, वडिलांच्या नंतर गुची फॅशन हाऊसमध्ये मारिझिओला ५०% वाट मिळाला होता. उरलेला हिस्सा त्याचा काकाअल्डो गुचीकडे होता. त्यामुळे सगळीच सूत्रे त्याच्या हाती एकवटलेली नव्हती. वडिलांच्या नंतर फक्त इनहेरीटन्स टॅक्स द्यावा लागू नये म्हणून मारिझिओ वडिलांच्या खोट्या सहीनेच कंपनीचे व्यवहार करत असे. त्याचे काका अल्डो गुचीने त्याची ही लबाडी उघडकीस आणली.



