साडी म्हणजे भारतीय स्त्रियांच्या मनाचा हळवा कोपरा. कपाटात कितीही साड्या असल्या तरी प्रत्येक नवी साडी खुणावतेच. आता भारतभर इतक्या वेगवेगळ्या पोताच्या प्रांतांतल्या, शैलीतल्या आणि चित्रकारितेने सजलेल्या साड्या असतात की यात त्या बिचार्या स्त्रियांचा दोष तो काय? आणि नावीन्याची हौस कुणाला नसते? गेल्या एक-दोन वर्षांत ’१०० पॅक्ट साडी’ म्हणून वर्षात किमान शंभरवेळा साडी नेसण्याचीही टूम निघाली आणि ज्यांनी यात भाग घेतला त्यांनी मनापासून ती एंजॉयही केली.
वरच्या चित्रात दिसतेय ती आहे जगातली सर्वात महाग साडी. ’चेन्नई सिल्क ’ या दुकानाद्वारे बनवण्यात आलेल्या या हातमागावरच्या साडीच्या पदरावर राजा रविवर्म्याचं चित्र आहे. नुसतं चित्रच आहे असं नाही तर ते हिर्यामाणकांनी जडवलेलं आहे. या साडीची किंमतच चाळीस हजार आहे. आता इतकी महागाची नाही तरी संग्रहात नसलेली एखादी साडी घ्यायला काय हरकत आहे?
साड्यांचे सगळे प्रकार एकाच लेखात आणणं कठीण आहे. म्हणून सादर आहेत देशातल्या विविध प्रांतातल्या काही रेशमी साड्या. आम्ही या प्रकारातले जाणकार आहोत असं आमचं मुळीच म्हणणं नाही. इथे नसलेला प्रकार आवर्जून सांगा आणि त्या साडीचा जमल्यास फोटोही इथे शेअर करा.










