नेटफ्लिक्सने ४० टक्क्यांपर्यंत दर कमी केलेत, आता नव्या दराने प्लॅन किती रुपयांना पडेल?

लिस्टिकल
नेटफ्लिक्सने ४० टक्क्यांपर्यंत दर कमी केलेत, आता नव्या दराने प्लॅन किती रुपयांना पडेल?

नव्या जमान्यात लोकांना बिंज वॉचिंग आणि Netflix , Amazon prime, Disney hotstar सारख्या OTT ची चटक्ल लागलीय. कुठे अमक्याच वेळी ढीगभर जाहिरातींसोबत, एकाच एक प्रकारचे एपिसोड पाहा, त्यापेक्षा हवं तेव्हा, हव्या त्या डिव्हाईसवर, हव्या त्या भाषेत, हव्या त्या देशातला कार्यक्रम पाहा. शिवाय जाहिरातींचा व्यत्यय नाही. हे सगळं असतानाच सध्या तुमच्यासाठी आणि तुमच्या खिशासाठी एक चांगली बातमी आलीय. Netflix या अग्रगण्य ओटीटीने आपले मासिक शुल्क कमी केलंय. आज या लेखात पाहूयात Netflix च्या नव्या किंमती आणि तरुण प्रेक्षक वर्गाची बदलती मानसिकता.

आपल्याकडे सध्या OTTमध्ये बरेच पर्याय आहेत. हिंदी-इंग्रजी-प्रादेशिक भाषांसाठी Netflix , Amazon prime, Disney hotstar तर आहेच, पण याबरोबरच खास प्रादेशिक भाषांसाठीचीही ओटीटी चॅनेल्स आहेत. आपल्यापुरतं पाहायचं तर मराठीत प्लॅनेट एम आहे. अजूनही यात नवे गडी येतच राहातील. खरं पाहायचं तर लॉकडाऊनमध्ये ओटीटी चॅनेल पाहण्याचा कल प्रचंड वाढला. टिव्ही मालिका बंद होत्या, नवे काही बघायला नव्हते. घरात बसून प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले. तिथे असणारे अनेक पर्याय, शिवाय जाहिराती नाहीत आणि विषयही नवीन, कधीही पाहता येणारा कार्यक्रम या सर्व कारणांमुळे ओटीटी चॅनेल बघणे वाढले. त्याच त्याच विषयाच्या रटाळ मालिका पाहण्याऐवजी नवे कलाकार आवडले. अनेक चित्रपटही आता ओटीटी वर प्रदर्शित होऊ लागल्याने घरबसल्या कुटुंबासोबत चित्रपटाचा आनंद घेता येऊ लागला. Netflix आणि अमेझॉन प्राईमवर अनेक नवनवीन हिंदी, इंगजी, तमिळ,न्तेलगू चित्रपट प्रदर्शित झाले. तसेच वेबसिरिज ही लोकप्रिय होऊ लागल्या. तसेही भारतात इंटरनेटचे प्लॅनही स्वस्त आहेत. त्यामुळे घरोघरी वायफाय दिसत आहेत.

Netflix ने ओटिटीची लोकप्रियता पाहून जास्तीत जास्त प्रेक्षक स्वतः कडे वळवण्यासाठी सबस्क्रिप्शनची किंमत ६० टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. १४ डिसेंबरपासून ग्राहकांना वेगवेगळ्या प्लॅन्सनुसार ६० टक्क्यांपर्यंत बचत मिळणार आहे. नेटफ्लिक्सच्या मासिक मोबाइल प्लॅनची किंमत आधी १९९ रुपये होती, ती आता २५ टक्क्यांनी कमी करून १४९ रुपये करण्यात आली आहे. तर ४९९ रुपयांचा मासिक प्लॅन आता १९९ रुपयांचा आहे. त्याचप्रमाणे बाकीचे प्लॅन्सही खूप स्वस्त झाले आहेत.
नेटफ्लिक्स प्रीमियम प्लॅनसाठी ग्राहकांना आता ७९९ रुपयांऐवजी ६४९ रुपये दरमहा द्यावे लागतील.
जर तुमच्याकडे आधीपासून नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन असेल, तर आजपासून तुम्हाला उच्च प्लॅनमध्ये अपग्रेड केले जाईल. ग्राहक आता स्टँडर्ड नेटफ्लिक्स प्लॅन ६४९ रुपयांऐवजी ४९९ रुपयांना खरेदी करू शकतील.

अमेझॉन प्राईमने नुकत्याच किमती वाढवल्या आहेत, तर नेटफ्लिक्सने वेगळी शक्कल लढवून किंमती खूप कमी केल्या आहेत. याचा फायदा प्रेक्षकवर्ग नक्कीच घेतील. तरुणाई आता अधिक चोखंदळ झाली आहे. आवडीप्रमाणे क्वालिटी कंटेट पाहण्याचा आता ट्रेण्ड वाढू लागला आहे. नेटफ्लिक्सने किंमत कमी करून ही स्पर्धा सुरू केली आहे. त्यामुळे इतर ओटिटी चॅनल आता पुढे काय करणार आहेत हे पाहणे रंजक ठरेल. पण येणारा काळ हा ओटीटी चॅनलचा असेल असे चित्र दिसू लागले आहे. तुमचे मत काय आहे?

शीतल दरंदळे