'द कंज्युरिंग' सिनेमाची खरीखुरी चेटकीण-बाथशेबा शर्मनची गोष्ट!! हा सिनेमा तिने त्रास दिलेल्या मुलीच्या डायरीवर बेतला आहे!!

लिस्टिकल
'द कंज्युरिंग' सिनेमाची खरीखुरी चेटकीण-बाथशेबा शर्मनची गोष्ट!! हा सिनेमा तिने त्रास दिलेल्या मुलीच्या डायरीवर बेतला आहे!!

भयपट पाहण्यात अनेकांना रस असतो. त्यातही ‘द कंज्युरिंग’ सारखा भयानक चित्रपट एकट्याने पाहणाऱ्याला सलामच करावा लागेल. या चित्रपटातील बाथशेबा शर्मन नावाची चेटकीण म्हणजे कोणी काल्पनिक पात्र नसून खरीखुरी चेटकीण होती असे सांगितलं तुम्हाला कितपत पटेल माहिती नाही, पण हे खरे आहे. ऱ्होड आयलँडमध्ये राहणाऱ्या या बाईने १८४९ मध्येच आत्महत्या केली होती. लोकांचं म्हणणं होतं की ती सैतानाच्या संपर्कात आहे आणि कनेक्टीकटमध्ये राहणाऱ्या अनेक मुलांच्या मृत्यूमागे तिचाच हात असल्याचा अनेकांचा दावा होता.

बाथशेबा थायर हिचा जन्म १८१२ साली झाला होता. वयाच्या ३२व्या वर्षी जड्सन शर्मन नावाच्या एका शेतकऱ्याशी तिचं लग्न झालं आणि ती कनेक्टीकटमध्ये राहायला आली. या जोडप्याला एक मुलगा झाला होता. तो तिने सैतानाला अर्पण केला. ती सैतानी शक्तीच्या संपर्कात असल्याचेही त्याचे म्हणणे होते. आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला तिने आपल्या हाताने मारून टाकले होते. कनेक्टीकटमधल्या त्यांच्या जमीनीवर राहायला येणाऱ्या प्रत्येकाला आपला रोष सहन करावा लागेल असा शाप देतच तिने एका झाडाला स्वतःला लटकावून घेतले होते.

तिच्या त्या शापाला घाबरून अनेक वर्षे त्या जमिनीवर कुणीही राहायला आले नव्हते. पण १९७१ सालातील एके दिवशी त्याच ठिकाणी पेरॉन नावाचे एक कुटुंब राहायला आले. तिथे राहायला येताच पेरॉन कुटुंबियांना विचित्र अनुभव येऊ लागले. त्यांच्या घरातील भांडी गायब होऊ लागली. त्या घरातील लहान मुलांना रात्रीच्या वेळी कुणीतरी बाई घरात शिरल्याचा भास होत असे. अँड्रिया पेरॉन ही या कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी. तीने आपले त्याकाळातील आलेले अनुभव तिच्या डायरीत नोंदवले आहेत. त्यांचे हे अनुभव ऐकल्या-वाचल्यानंतर अंगावर काटा उभारल्याशिवाय राहणार नाही. तिच्या याच लिखित अनुभवांच्या आधारे ‘द कंज्युरिंग’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे.

पेरॉन कुटुंबियाला बाथशेबाच्या शापाचा अनुभव येत होता यात वादच नव्हता. पण बाथशेबाला सैतानाशी जवळीक करून स्वतः एक चेटकीण होण्याची बुद्धी का सुचली असेल? प्रश्नाचे उत्तर मिळवायचे तर तिच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावल्याशिवाय पर्याय नाही.

१८४४ साली वयाच्या ३२व्या वर्षी बाथशेबा लग्न होऊन कनेक्टीकटमधील शर्मन फार्मवर नवी नवरी म्हणून आली. नव्या नवरीकडे शेजाऱ्यापाजाऱ्यांचे चांगलेच लक्ष होते. काही दिवसांनी शेजाऱ्यांना लक्षात आले की, हे प्रकरण दिसते तसे साधे नाही. ही नवरी म्हणजे एक पीडाच आहे. याला कारणही तसेच होते. एके दिवशी बाथशेबा आपल्या एका शेजाऱ्यांकडे गेली होती. बाथशेबा त्यांच्या घरातून बाहेर पडली आणि त्यांचा मुलगा तिथेच मरून पडला होता. डॉक्टरांच्या मते त्या मुलाच्या कवटीवर मार बसला होता.

सगळ्या शेजाऱ्यांचे एकच म्हणणे होते बाथशेबाने त्या मुलाला मारून टाकले. कारण त्या मुलाला शेवटचं खेळवणारी तीच होती. तेव्हापासून सर्वच शेजारी तिच्याशी फटकून वागू लागले. शेजारच्याच नाही, तर बाथशेबाने स्वत:च्या मुलालाही मारून टाकले असे खुद्द तिच्या नवऱ्याचे म्हणणे होते. त्याने स्वत: तिला आपल्या पोटच्या मुलाच्या नरड्याला सुई लावताना पहिले होते. वरून हे मूल मी सैतानाला अर्पण करत असल्याचेही ती म्हणत होती. स्वत: तिच्या नवऱ्यानेच हे दृश्य पहिले होते. ती रात्रभर सैतानाशी बोलत बसते असेही तो म्हणत असे. याचवेळी तिने स्वतःही आत्महत्या केली. तिच्या त्या घरात राहायला येणाऱ्या कुणालाही ती सोडणार नाही असे म्हणतच तिने जीव दिला होता. तिचा शाप खरा होईल या भीतीने त्या ठिकाणी कित्येक वर्षे कोणीही राहायला येत नव्हते. जड्सन शर्मन यांचाही १८८१ साली मृत्यू झाला. आश्चर्याचा भाग म्हणजे बाथशेबाचा मृत्यू १८४९ साली झाला असला तरी तिच्या थडग्यावर मात्र २५ मे १८८५ हीच तारीख तिचा मृत्यूची तारीख म्हणून कोरण्यात आली आहे. त्यामुळे अँड्रीयालाही आपल्याला त्रास देणारे भूत हे बाथशेबाचे भूत होते यावर अजिबात विश्वासच बसत नाही.

१९७० साली त्या ठिकाणी पेरॉन कुटुंबीय राहायला आले. या कुटुंबाचे प्रमुख रॉजर पेरॉन यांची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे त्यांना या ठिकाणी येणे भाग पडले. १४ खोल्यांच्या त्या फार्महाऊसमध्ये राहायला येताना त्यांनी कल्पनाही केली नसेल की इथे आल्यावर त्यांना अशा काही विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागेल. त्यांची बायको कॅरोलनी आणि त्यांच्या पाच मुली सुरुवातीला तर एवढं मोठं घर पाहून खूपच आनंदून गेल्या होत्या. पण नंतर मात्र त्यांना एकेक दिवस काढणेही जिकीरीचे वाटू लागले. त्यानंतर त्यांच्यासोबत काय काय झाले हे तुम्ही ‘द कंज्युरिंग’ मध्ये पाहिलेच असेल.

घरातून विचित्र आवाज येणे, कुठल्या तरी स्त्रीची सावली दिसणे, घरातील भांडी, वस्तू अचानक गायब होणे, असे काही विचित्र अनुभव त्यांना येऊ लागले. यामागचे कारण शोधण्यासाठी जेव्हा कॅरोलनी पेरॉनने आजूबाजूला चौकशी सुरु केली तेव्हा तिला समजले की या घराच्या पहिल्या मालकीणीचे भूत इथे कुणालाच सुखाने जगू देत नाही. या ठिकाणी जे कोणी राहायला आले, त्यांच्याशी काही ना काही अपघात नक्कीच घडला आहे. कुणी आत्महत्या केली, तर कुणी तळ्यात बुडून मेले. हे समजल्यावर कॅरोलनीने वॉरेन नावाच्या एका दांपत्याशी संपर्क साधला. हे जोडपे स्वतःकडे अद्भुत शक्ती असल्याचा आणि त्याद्वारे दुष्ट आत्मे पळवून लावण्याचा दावा करत होते. कॅरोलनीची कहाणी ऐकल्यानंतर वॉरेन दांपत्याने तिला मदत करण्याची तयारी दर्शवली.

त्यांनी बाथशेबाच्या आत्म्याला पळवून लावण्यासाठी काही विधी सुरू केले. तेव्हा तर कॅरोलनीला खूपच जास्त त्रास जाणवू लागला. अँड्रियाच्या मते तिच्या आईला कुणा आत्म्याने झपाटले होते. “माझी आई कुठली तरी वेगळीच भाषा बोलत होती आणि तेही दुसऱ्या कुणाच्या तरी आवाजात. जेव्हा आम्ही ते विधी सुरू केले तेव्हा कुणीतरी माझ्या आईला फरफटत नेत होते, तिचे डोके जोरजोराने भिंतीवरती आपटले जात होते. आता आई मरणारच असाच माझा समज झाला होता. कोणी यावर विश्वास ठेवो अगर न ठेवो पण, हे सगळे आम्ही अनुभवले आहे,” असे ती म्हणते. वॉरेन दांपत्याच्या प्रयत्नामुळे हे कुटुंब त्या आत्म्याच्या तावडीतून सुखरूपपणे बाहेर निसटले.

अँड्रियासह संपूर्ण पेरॉन कुटुंब आज सहीसलामत आहे.

बाथशेबा शर्मनच्या या खऱ्याखुऱ्या कथेवर तुमचा कितपत विश्वास बसेल?

मेघश्री श्रेष्ठी