द्मावती सिनेमाच्या नावातील ‘आय’ काढून टाकल्यावर त्याचा पद्मावत तर झाला.. पण संस्कारी सेन्सॉर बोर्डवाले इथेच थांबले नाहीत राव. असं म्हणतात की चित्रपटात ५ बदल केले गेले आहेत. हे बदल कोणते आहेत ते तुम्ही सिनेमा रिलीज झाल्यावर बघालच, पण यातील एक बदल आज आम्ही रिलीजच्या आधीच दाखवून देणार आहोत.
घुमर हे पद्मावत(ती) सिनेमातलं पाहिलं गाणं. या गाण्यात पद्मावती राणी राजस्थानमधलं पारंपारिक घुमर नृत्य करताना दिसत आहे. हे करणी सेनेसकट अनेकांना पचनी पडलं नाही. पहिला प्रश्न म्हणजे एक राणी अशा पद्धतीने सर्वांसमोर नाचू शकते का आणि दुसरं म्हणजे तिने घातलेले कपडे राजघराण्याला शोभतात का? म्हणजे दीपिकाचा ड्रेसदेखील वादाचा मुद्दा ठरलाय्. या गाण्यात तिच्या पोटाचा भाग दिसत असल्याने आपल्या सेन्सॉर बोर्डाने दीपिकाच्या पोटाला झाकण्याचा निर्णय दिलाय. त्यानुसार फिल्मच्या निर्मात्यांनी VFX च्या माध्यमातून तो भाग झाकून टाकला आहे. आता हे दीपिकाचं नवीन रूप तिच्या फॅन्सना पचनी पडत नाहीये ती वेगळी गोष्ट.
तर आता हा नवीन व्हिडीओ पाहा राव. पद्मावतीला संस्कारी रूप दिलेलं या नवीन ‘घुमर’ गाण्यात तुम्ही पाहू शकता.
एकंदरीत पद्मावती सिनेमात जे काही असंस्कारी होतं ते सर्व झाकण्याचा प्रयत्न यातून दिसतोय. इतिहास तज्ञांच्या सल्ल्यानुसार हे बदल करण्यात आले आहेत अशी बातमी आहे. आता सेन्सॉर बोर्डचा एवढा सपोर्ट मिळून सुद्धा करणी सेनेला यातलं काहीच पटलेलं दिसत नाही. आता त्यांनी चित्रपटगृह जाळण्याची धमकी दिली आहे. आणि कुठल्याशा त्या राजस्थानी स्त्रीसंघटनेनं जोहार करायचीही धमकी दिलीय..
एका चित्रपटासाठी एवढं रामायण व्हावं इतकं महत्व चित्रपटाला द्यावं का?
आता हे जरी खरं असलं तरी संजय लीला भन्साळीनं देखील प्रत्येक वेळी अशी माती खावीच का? पद्मावत तर काल्पनिक काव्य आहे.. पण् "पोरी पिंगा.." म्हणत लावणी स्टेप्सवर नाचकाम करणाऱ्या लो-वेस्टसाडीतल्या पेशवीणबै आणि "दुश्मनची वाट लावली.." म्हणत उड्या मारत नाचणारे पेशवे तरी कुठं इतिहासाशी इमान राखत होते की त्यांची काही आदब त्या सिनेमात दिसते.
असो, किमान पुढच्या सिनेमाच्या वेळी भन्साळी अशा वादग्रस्त विषयाला हात घालणार नाहीत अशी आपण अपेक्षा करूयात..
