मंडळी, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठ आयुष्यभर लढा देणाऱ्या शूर क्रांतिकारकांच्या यादीत सुभाषचंद्र बोस, म्हणजेच आपल्या नेताजींचं नाव अग्रस्थानावर घ्यावं लागेल. इंग्रजांशी लढण्यासाठी नेताजींनी जपानसारख्या देशांच्या मदतीने आझाद हिन्द सेनेची स्थापना केली. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडीशामधील कटक या शहरात झाला. वडिल जानकीनाथ बोस ; एक नामवंत वकील होते आणि त्यांना १४ मुलं होती. त्यापैकी सुभाषबाबू हे नववे अपत्य होते.
सुभाषबाबूंच्या आयुष्यातील अनेक गोष्टींपासून त्यांच्या गूढ मृत्यूपर्यंत बर्याच बाबींची चर्चा आजही चालू आहे. पण तुम्हाला माहीतीये का? देशावर जीवापाड प्रेम करणार्या नेताजींचं एका विदेशी स्त्रीवर प्रेम जडलं होत! आणि दोघांनी लग्नही केलं होत!!

१९३४ मध्ये इंग्रजांनी नेताजींना भारतातून निर्वासित केल्यानंतर ते युरोपमध्ये गेले. व्हिएन्नामधून ते आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील सहकार्यांना पत्र लिहायचे. तिथेच त्यांनी आपलं अॉफीस उघडलं. त्यामुळे टायपिंग करण्यासाठी त्यांना एक मदतनीस हवा होता. त्यासाठी डॉ. माथूर या मित्राने त्यांची ओळख मिस एमिली शेंकल अॉस्ट्रीयन वंशाच्या मध्यमवर्गीय तरूणीशी करून दिली.
एमिली नेताजींकडे सेक्रेटरी म्हणून रूजू झाल्यानंतर दोघांचं एकमेकांवर प्रेम जुळलं. एक वर्षानंतर सुभाषबाबू भारतात परत आले. पण आपल्या व्यस्त आयुष्यातूनही वेळ काढून अधूनमधून ते एमिलीला पत्र पाठवायचे. त्यांनी एमिलीला अशी १६५ पत्रे लिहिली आहेत.
तु पहिली महिला आहेस जिच्यावर मी प्रेम केलं. देवाकडून हेच मागेन की तुच माझ्या जीवनात शेवटची स्त्री म्हणून रहावीस.
"मी कधी विचार केला नव्हता की एका स्त्रीचं प्रेम मला बांधू शकेल. याआधी अनेकांनी मला प्रेम करण्याचा प्रयत्न केला पण मी कोणाकडे पाहिलं नाही. पण तु मला आपलं बनवलंस."
या त्या पत्रातल्या ओळी आहेत ज्या नेताजींनी एमिली शेंकलसाठी लिहिलं होतं. १९३७ मध्ये दोघांनी गुप्तपणे लग्न केलं होतं. त्यांना १९४२ मध्ये अनिता नावाची मुलगी झाली. नेताजींच्या मृत्युनंतर ५० वर्षे एमिली जिवंत होती.

स्वातंत्र्यानंतरच्या थोड्या काळानंतर नेताजींनी लिहिलेली ही पत्रे प्रकाशीत झाली जी एमिलीने जपून ठेवली होती. अॉक्सफर्ड युनिव्हर्सिटीने साहित्याचा एक भाग म्हणून ती प्रकाशित केली होती.

तर मंडळी अशी होती ही नेताजींच्या जीवनातली प्रेमकहाणी. आपल्या देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं योगदान अमूल्य आहे. त्यांच्या जन्मदिनी बोभाटा परिवाराकडून त्यांना मनःपूर्वक अभिवादन!!
