१७९९मध्ये श्रीरंगपट्टणमला टिपू सुलतानाचा मृत्यू झाला. त्याला म्हणे बारा मुलं होती आणि त्यांना टिपूच्या पाडावानंतर ब्रिटिशांनी कलकत्याच्या टोलीगंजमध्ये हलवलं. एका बातमीनुसार आता त्या बाराजणांपैकी खूप कमीजणांच्या पुढच्या वंशजांबद्दल माहिती उपलब्ध आहे. आणि जे सध्या हयात आहेत, तेही खूप हलाखीचं आणि गरीबीचं जिणं जगत आहेत.
पण या टिपू सुलतानाला कासिमबी नावाची मुलगीही होती. अगदी सिनेमात दाखवतात तसं टिपूच्या दोन अधिकार्यांनी तिला पळवलं. तिची ओळख लपवली. सुरक्षित ठिकाणी ठेवलं आणि योग्य वेळ आल्यावर ज्याच्याकडे राजचिन्हं आहेत अशा पुरूषाशी तिचा निकाह लाऊन दिला. अर्थातच तेव्हा त्याला आपली पत्नी कोण आहे हे सांगण्यात आलं होतं. कासिमबी आणि तिचा नवरा मौला बख्श बडोद्याला स्थायिक झाले. पुढे या दोघांचा एक नातू –इनायत खान- सूफी पंथाच्या प्रसारासाठी युरोपात गेला आणि तिकडेच राहिला. आपण बोलत आहोत या इनायत खानांच्या एका मुलीविषयी- नूरून्निसा इनायत खानविषयी.
तर ही नूरून्निसा , जिला सगळं जग नूर म्हणून ओळखतं, होती पहिली महिला वायरलेस रेडिओ ऑपरेटर. दुसर्या महायुद्धात ती जर्मनीविरूद्ध ब्रिटिशांच्या बाजून्म लढली. आहे ना गंमत.. टिपू इंग्रजांच्या विरोधात लढत मरण पावला तर त्याच्याच खापरपणतीनं इंग्रजांच्या बाजूनं युद्ध लढलं. ती तर चक्क युद्धातली गुप्तहेर बनली. शत्रूच्या हाती सापडली पण त्यांना काहीही माहिती दिली नाही. नूर वयाच्या तीशीच्या आतच मरण पावली पण आपल्या कार्यानं सगळ्यांच्या स्मरणात राहिलीय. चला वाचा तर मग, काय आहे तिची कहाणी..





