कोर्टाचा जगावेगळा न्याय, शेतकऱ्याला देऊन टाकली रेल्वे!

कोर्टाचा जगावेगळा न्याय, शेतकऱ्याला देऊन टाकली रेल्वे!

लुधियाना कोर्टानं एक जगावेगळा निकाल दिलाय. त्यांनी  "सुवर्ण शताब्दी एक्सप्रेस" नावाची आख्खी रेल्वेच भरपाई म्हणून ‘संपूर्ण सिंह’ नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावावर केलीय. ३०० मीटर लांबीची ट्रेन, आणि ती पण एका शेतकऱ्याला?  हो. हे खरंय... ऐकाच तर मग ही गोष्ट...

तर झालं असं की, २००७ साली लुधियाना-चंदिगढ रेल्वे लाईनसाठी सरकारने संपूर्ण सिंहकडून त्याची जमिन विकत घेतली. त्या जमिनीची किंमत ठरली  १ करोड ४७ लाख रुपये. पण रेल्वेने तेवढे पैसे त्याला दिलेच नाहीत. त्याला या व्यवहारात मिळाले फक्त ४२ लाख रुपये!!  उरलेले पैसे न मिळाल्यामुळं  संपूर्णसिंहनं २०१२ साली कोर्टात धाव घेतली.  होता होता कोर्टानं २०१५ साली त्याच्या बाजूनं निकाल दिला. एवढं होऊनही रेल्वेने संपूर्णसिंहला पूर्ण पैसे काही दिले नाहीत.

मग पुन्हा एकदा संपूर्णसिंह कोर्टात गेला. तेव्हा जिल्हा व सत्र न्यायाधीश ‘जसपाल वर्मा’ यांनी भरपाई म्हणून सुवर्ण शताब्दी एक्सप्रेसच संपूर्ण सिंहच्या नावावर केली.

आता पूर्ण ट्रेन आपल्या नावावर झाली म्हटल्यावर संपूर्ण सिंह खूष झाले आणि आपल्या वकीलासोबत  रेल्वे ताब्यात घ्यायला   गेले. पण अर्थात एक पॅसेंजर ट्रेनरेल्वेखातं तरी कसं कुणाच्या ताब्यात देणार?  सेक्शन इंजीनियरनं ट्रेनला कोर्टाची मालमत्ता असल्याचं घोषित केलं. पण याला संपूर्ण सिंहनेही विरोध केला नाही. कारण या सगळ्या प्रकरणात प्रवाश्यांचे खूपच हाल झाले असते.

जरी त्यानं यावर आक्षेप घेतला नसता  तरी ३०० मीटर लांबीची भलीमोठी ट्रेन त्यानं घरी कशी नेली असती हा प्रश्न तर आहेच, पण तिचं काय केलं असतं हा प्रश्नही पुढे उरतोच..