सत्तरीचं म्हातारं करतंय थेरं...बायकोपासून दूर राहण्यासाठी बँकेवर दरोडा !!!

सत्तरीचं म्हातारं करतंय थेरं...बायकोपासून दूर राहण्यासाठी बँकेवर दरोडा !!!

या जगात नवरा बायकोची भांडणं होणारच ! रोज कटकट होणार - अधून मधून कट्टी होणार, काही दिवसानी बट्टी होणार,  हे सगळं संसार म्हटल्यावर होणारच होणार. पण अमेरिकेतला एक  महाभाग या रोजरोजच्या कुरबुरीला कंटाळून बायकोला म्हणाला, "तुझ्यासोबत राहण्यापेक्षा मी जेलमध्ये राहणं जास्त पसंत करेन.”

बरं, बोलला तर बोलला.. .आणि जेलमध्ये जाण्यासाठी त्यानं चक्क बँकेवरच दरोडा घातला. अमेरिकेतल्या कॅन्सास या शहरात राहणार्‍या 'लॉरेन्स जॉन रिपल' या सत्तरीच्या म्हातार्‍या माणसानं हे उपदव्याप केलेत. ते ही फक्त आणि फक्त बायकोपासून दूर राहण्यासाठी !!

बँकेत गेल्यावर हा इसम कॅश काउंटरला उभा राह्यला आणि त्यानं कॅशिअरकडं एक चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं,"मुकाट्यानं पैसे दे, माझ्याकडे गन आहे ". बिचार्‍या कॅशिअर्नं पैसे दिल्यावर हे महाशय बँकेतल्या सोफ्यावर गप्प बसून राह्यले आणि सिक्युरीटी गार्ड आल्यावर त्याला सांगितलं,"मीच तो दरोडेखोर!!"

आता या मूर्खपणाला काय म्हणावं हे कोर्टाला समजेनासं झालं असावं. पण शहाण्या कोर्टानं त्याला चक्क सहा महिने घरातच स्थानबध्द राहण्याची सजा फर्मावलीय !! 
आहे की नाही गंमत?  जे टाळण्यासाठी हे बिनडोक उद्योग या म्हातार्‍यानं केले तेच त्याच्या अंगावर उलटले की !!

आता राहातंय म्हातारं मुकाट आपल्या घरी !!