आपल्याला भविष्याची कितीही ओढ असली तरी भूतकाळाचं रहस्यही तितकंच खुणावत असतं. कदाचित म्हणूनच आपण इतिहासातून प्रेरणा मिळवण्याचा प्रयत्न करतो. इतिहास अभ्यासण्यासाठी कित्येक साधनांचा वापर केला जातो त्यातील एक महत्वाचे साधन म्हणजे ऐतिहासिक स्थळे. मात्र ऐतिहासिक स्थळांबद्दल आपल्याला जितकी ओढ वाटते किंवा त्यांची जितकी माहिती आहे तितकी कदाचित ऐतिहासिक झाडांबद्दल नसावी. हो. फार फार वर्षांपासून या पृथ्वीतलावर जी झाडे अस्तित्वात आहेत त्यांची माहिती आज आम्ही या लेखातून घेऊन आलो आहोत. हो, हजारो वर्षापासून पृथ्वीवर आपले अस्तित्व टिकवून राहिलेली काही झाडे, जी फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच आहेत, पण अजूनही आहेत.
सेन्ट्रल फ्लोरिडाच्या दलदलमय प्रदेशात सुमारे ३५०० वर्षापूर्वी एक छोटेसे सुरूचे झाड उगवले होते. २०१२ साली हे झाड आगीमुळे नष्ट झाले. जगातील खूप जुने झाड म्हणून या झाडाला ‘द सिनेटर’ म्हटले जात होते. पर्यटकांसाठी आकर्षण स्थळ असणारे आणि ऐतिहासिक क्षणांचा एक साक्षीदार म्हणून ज्याकडे पहिले जात होते, ते झाड आज पृथ्वीतलावर जिवंत नसले तरी त्यासारखीच काही झाडे संपूर्ण जगभर विखुरली आहेत. चला तर मग पाहूया, जगातील सर्वात जुनीपुराणी ही झाडे आहेत तरी कुठली आणि कुठे?






