१९५० च्या दशकाच्या सुरुवातीला कॉम्प्युटर क्षेत्र बाल्यावस्थेत होतं. त्यावेळी या क्षेत्रात येण्यासाठी विशिष्ट औपचारिक प्रशिक्षण आवश्यक नसे. कॉम्प्युटर क्षेत्रातील कंपन्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आवश्यक कौशल्यं असणाऱ्या कोणालाही नोकरी देऊ करत. त्यात ब्रिज खेळणारे, बुद्धिबळ खेळणारे, गणिताचे प्राध्यापक असे विविध लोक असायचे. अशा लोकांपैकी एक म्हणजे जीन समेट ही स्त्री. पण तिची ओळख केवळ या लोकांपैकी एक अशी नाही. ती कोबोल या प्रोग्रामिंग लँग्वेजची जन्मदात्री आहे.
त्या काळात कॉम्प्युटर हे एक मोठं अवजड आणि गुंतागुंतीचं यंत्र असे. आतासारखं घेतला कीबोर्ड आणि बडवल्या कीज असा उद्योग नसे. कॉम्प्युटरला डेटा इनपुट करण्यासाठी तो आधी कार्डावर पंच केला जात असे. या कार्डांवर कुठे आणि कशी छिद्रे आहेत यावरुन त्यावर काय लिहिलं आहे हे ठरत असे. मग ती कार्डस खास यंत्रांनी वाचली जात, मग तो डेटा प्रोग्रॅम्सकडून प्रोसेस होऊन आऊटपुट मिळे. हे आऊटपुटही सरळ दिसत नसे. तर ते पुन्हा पंच करुन पंच कार्ड रीडरकडून वाचून घेतले जात असे. प्रोग्रॅमिंगही काही सोपा प्रकार नव्हताच. तरी अगदीच असेंब्ली लॅन्ग्वेजमध्ये प्रोग्रामिंग करावं लागत नसे. पण तेव्हाचे प्रोग्राम्स हे सर्वसाधारणपणे काहीतरी गणिती कामं करणारे अधिक असत. पण मग आताशा आपण वापरतो तसे खरेदी-विक्रीचा ताळेबंद ठेवणारे, कर्मचारी आणि ग्राहकांची माहिती सांभाळणारे, थोडक्यात निरनिराळ्या उद्योगांना उपयोगी पडेल असे प्रोग्रामिंग तितकेसे व्हायचे नाही आणि त्याकाळच्या कॉम्प्युटर लँग्वेजेसही त्यासाठी काही खूप अनुकूल अशा नव्हत्या.
साहजिकच जीनने पहिल्यांदा कॉम्प्युटर पाहिला तेव्हा तिला या यंत्राविषयी काडीचीही जवळीक वाटली नव्हती. उलट काहीसा तिटकाराच वाटला होता. तिचा हा दृष्टीकोण त्या काळातल्या गणित अभ्यासकांना साजेसाच होता. ते सगळे लोक असाच विचार करायचे. मात्र काही दिवसांतच तिच्या तिरस्काराचं रूपांतर आवडीत झालं. ज्या काळात कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी पंच केलेल्या कार्डचा वापर व्हायचा, त्या काळात तिने गणितीय कॅलक्युलेशन्स करण्यासाठी प्रोग्राम्स तयार केले आणि तिला हे क्षेत्र चक्क आवडायला लागलं! तिची आवड पुढे इतकी वाढली की त्याने तिला कॉम्प्युटिंगच्या सुरुवातीच्या दिवसातली एक यशस्वी महिला म्हणून ओळख मिळवून दिली. कॉम्प्युटरच्या क्षेत्रात तिला सगळ्यात जास्त रस प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये होता. या लँग्वेजेस लोकांना शिकण्यासाठी सर्वत्र उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा लोकांनी पुरेपूर वापर करून घ्यावा असं तिचं मत होतं. प्रत्येक माणसाचा कॉम्प्युटरशी काही ना काही संवाद घडावा, हे तिचं स्वप्न होतं.


