एक वर्षाचे बाळ काय करते? असा प्रश्न कोणी विचारला तर हसूच येईल. एवढंसं ते बाळ!! खाणार, खेळणार, लंगोटी-दुपटी भिजवणार आणि झोपणार!! आणखी काय करणार. हो ना? पण अमेरिकेत एक वर्षाचं बाळ चक्क कमाई करत आहे. आणि तीही थोडीथोडकी नव्हे, तर चक्क १००० डॉलर्स म्हणजे ७५,००० रुपये! चकित झालात ना? ब्रिग्स डॅरिंग्टन असे त्या एक वर्षाच्या बाळाचे नाव आहे. तो आपल्या पालकांसोबत अमेरिकेत फिरून फोटो आणि व्हिडीओ ब्लॉग करून महिन्याला बक्कळ कमाई करतेय. सर्वात लहान वयातील कमाई करणारा हा बाळ सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय.
ब्रिग्स डॅरिंग्टन तीन आठवड्यांचा असल्यापासून अमेरिका प्रवास करत आहे. त्याच्या पालकांसोबत फिरत त्याने आतापर्यंत ४५ उड्डाणे केली आहेत. तो फक्त नऊ आठवड्यांचा असताना त्याने पहिला विमानप्रवास केला. ब्रिग्सचा जन्म १४ ऑक्टोबर २०२० ला झाला आहे. ब्रिग्स फक्त तीन आठवड्यांचा असताना त्याच्या आईबाबाने पहिली सहल नेब्रास्कामधल्या एका ग्लॅम्पिंग साइटवर केली. आतापर्यंत त्याने अमेरिकेतल्या १६ राज्यांना भेट दिली आहे.


