झुकरबर्ग मेटाव्हर्स आणणार आहेत! या मेटाव्हर्सचे नाव-गाव-फळ-फूल तर वाचा... झुकरबर्गना हवं ते मेटाव्हर्स नक्की काय आहे?

लिस्टिकल
झुकरबर्ग मेटाव्हर्स आणणार आहेत! या मेटाव्हर्सचे नाव-गाव-फळ-फूल तर वाचा... झुकरबर्गना हवं ते मेटाव्हर्स नक्की काय आहे?

तंत्रज्ञान शाप की वरदान हा प्रश्न आधी पडला की वाटायचे शापच असावा. पण गेल्या २ वर्षांत सगळीच गणितं बदलली आहेत. हे तंत्रज्ञान नसते तर आपण सर्वजण हा अवघड काळ कसा काढला असता याचा विचार न केलेलाच बरा. तंत्रज्ञानाचा कितीही त्रास असला तरी यामुळे माणसाचे जीवन खूपच सुकर झाले आहे यात वाद नाही. शाळा-ऑफिसेस सर्वकाही ऑनलाईन होऊ शकले. घरबसल्या इतरही अनेक कामे होऊ शकली. आता या तंत्रज्ञानातही अनेक नवनवीन गोष्टी येत राहतात. अशातच एक नव्या बातमीने लक्ष वेधून घेतले आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग काहीतरी नवीन सुरू करत आहेत. मेटाव्हर्स हे बनवण्यात व्यस्त असल्याची चर्चा आहे. यासाठी त्यांनी नवीन भरती ही सुरू केली आहे. मेटाव्हर्स म्हणजे काय? त्याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत.

मेटाव्हर्स हा शब्द युनिव्हर्स शब्दाच्या धर्तीवर समजून घेता येईल. युनिव्हर्स म्हणजे विश्व, तर मेटाव्हर्स म्हणजे खरेतर अस्तित्वात नसलेले, परंतु तंत्रज्ञान ते अस्तित्वात आहे असेच भासवते असे विश्व!! म्हणजे पाहताना एखाद्याला कदाचित ही VR म्हणजेच व्हर्च्युअल रिएलिटी (Virtual Reality) ची सुधारित आवृत्ती वाटू शकेल. मेटाव्हर्स म्हणजे व्हर्च्युअल रिॲलिटीद्वारे उभं करण्यात आलेलं असं एक जग जिथे तुमचा एक डिजिटल अवतार असेल आणि कम्प्युटरने निर्माण केलेल्या या जगाचा इतर युझर्ससोबत तुम्ही अनुभव घेऊ शकाल.

थोडक्यात सांगायचं झालं तर आपले जुने फोन जाऊन स्मार्टफोन आले. जुने टिव्ही जाऊन स्मार्टटिव्ही आले. तसंच काहीसं VR आणि मेटाव्हर्सबद्दल म्हणता येईल. म्हणजे कॉम्प्युटरऐवजी एखादा हेडसेटवापरून तुम्ही या मेटाव्हर्सचा अनुभव घेऊ शकता. हा हेडसेट तुम्हाला एका व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजे आभासी जगाशी जोडेल.

सध्या व्हर्च्युएल रिएलिटी म्हणजेच VR चा वापर हा जास्त गेमिंगसाठी केला जातो. पण सोशल मीडियावर तुमचा 3D अवतार तुम्हाला नव्या जगात घेऊन जाणार आहे. तशी मेटाव्हर्सची अजून नेमकी अशी एक व्याख्या नाही. यावर काम चालू आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना मेटाव्हर्सचे आभासी जग निर्माण करायचे आहे. एकच शुल्क भरून कोणीही या जगात पोहोचू शकतो. त्याच्या मनाप्रमाणे, तो अवतार निवडू शकतो, तसेच जग निवडू शकतो. म्हणजे ज्या मेटाव्हर्समध्ये त्याला जायचे आहे ते तो निवडू शकतो.यासाठी फक्त वैयक्तिक संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईल फोन पुरेसे आहेत. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वास्तविक जगाचे संकरित स्वरूप असेल. जसे आपण सोशल मीडियावर लोकांना दररोज पाहतो, त्याचप्रमाणे आपण त्यांना तेथेही पाहू शकू. पण फरक एवढाच असेल की आपण त्या जगात अस्तित्वात असू.

फेसबुकने VR सेट Oculus आधीच लॉन्च केला आहे. Oculus नावाचा हा VR हेडसेट बनवणाऱ्या कंपनीला फेसबुकने 2014 मध्ये खरेदी केले होते. यानंतर 2019 मध्ये फेसबुकने होरायझन नावाचे एक आभासी जग लॉन्च केले होते. ते जगही या हेडसेटशी कनेक्ट होऊ शकते. या जगात प्रवेश करण्यासाठी फेसबुककडून विशेष आमंत्रण आवश्यक आहे. ऑक्युलस हेडसेट घालून कोणीही या जगात प्रवेश करू शकतो. ते हेडसेट डोळे आणि कानावर बसतात. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष त्या जगात वावरता आहात असे वाटेल. उदाहरणार्थ, ऑगस्ट 2021 मध्ये फेसबुकने होरायझन वर्करुम्स सुरू केले. ते वापरताना तुम्हांला वाटेल की तुम्ही प्रत्यक्ष ऑफिसमधे बसून काम करत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही घरी किंवा सहलीवर असू शकाल. Wfh वाढल्यामुळे प्रत्यक्ष ऑफिसचा अनुभव देण्यासाठी हे वर्करुम्स सुरू केले गेले.

या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने पुढे जात आहेत. पुढील 5 वर्षांसाठी फेसबुक मेटाव्हर्स तयार करण्यासाठी युरोपियन युनियनच्या देशांमधून 10,000 लोकांची भरती करणार आहे. हे सर्व प्रत्यक्षात यायला बरीच वर्ष जातील.
पण मेटाव्हर्स हे इंटरेनेटचं भविष्य असेल, असं काहींना वाटतंय. एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटात जसे हिरो प्रत्यक्ष वेगळ्या जगात जाऊन येतो असे दाखवतात तसा काहीसा अनुभव यामध्ये मिळणार आहे. सध्या तरी हे काल्पनिक वाटले तरी प्रत्यक्षात येईल आणि त्यामुळे अजून किती बदल घडतील हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.

शीतल दरंदळे