.
फिरायला जाण्यासाठी पॅकिंग करताहात? काही विसरलं तर नाही ना ? १० व्या क्रमांकाची वस्तू सामानात हवीच हवी


१. गुंडाळी होणारा प्रवासी पाऊच:
हातासरशी लागणार्या ब्रश, टूथपेस्ट, कंगवा, शेव्हिंग किट यांसारख्या गोष्टींसाठी उत्तम. शक्यतो योग्य लांबीचं आणि अडकवता येईल अशा छापाचं पाहावे म्हणजे वापरास सहज पडते.
चित्रस्त्रोत

2. बॅकपॅक
रोजच्या साईटसीईंगसाठी एक कप्पे असलेली बॅग सोबत असलेली बरी. तीत पाण्याची एखादी बाटली, टोपी, गॉगल, कॅमेरा, त्याचे एक्स्ट्रॉ सेल, स्कार्फ, एखादे खाऊचे पाकीट ईत्यादी सोबत ठेवता येईल. काही तातडीची औषधे व बॅन्ड-एड सारख्या वस्तूही सोबत असायला हरकत नाही. कित्येकदा अशी औषधे हॉटेलवर राहतात आणि ऐनवेळी धावपळ होते. फिरताना हात रिकामे शक्यतो असतील तर अधिक उत्तम.

३. भूकलाडू/खाऊ
भूकलाडू म्हणून सुकामेव्याच्या पुड्या सोबत ठेवाव्यात. पुड्या आकाराने लहान तर असतातच, आणि त्यामुळे ऊर्जा अधिक मिळते हाही फायदा होतो. सुकामेवा खाल्ल्याने तहान कमी लागते त्यामुळे पाण्याच्या बाटल्यांचे ओझे वाचते. बरे वाटेत पाणी विकत घेऊ असे ठरवले तर कित्येकदा हवे तेव्हा विक्रेते आसपास नसतात व काहीवेळा ते अव्वाच्या सव्वा भाव लावतात. २६/११ च्या हल्ल्याच्या वेळेस याच कारणांमुळे अतिरेक्यांनी सुक्यामेव्याचा पुष्कळ साठा सोबत ठेवल्याच्या बातम्या आल्या होत्या. सुकामेवा अगदीच आवडत नसेल तर लो-कॅलरी उपाय म्हणून ओट्स बार जवळ ठेवायला हरकत नाही.

४. आरोग्यं धन संपदा
भटकंती करताना आरोग्याची काळजी घेतली नाही तर सगळी मजाच निघून जाते. यासाठी काही मूलभूत औषधे बॅगेत असणं आत्यंतिक महत्वाचे आहे. सर्दी खोकला- लूज मोशन्सची, एखादा उसण भरल्यावर मारायचा स्प्रे, डासांची कॉईल/ओडोमॉस/मॉस्किटो रिपेलंट इत्यादी गोष्टी सोबत असणं अपरिहार्य आहे. आपल्याला काही विशिष्ट औषधांनीच फरक पडत असेल तर मग अगदी आवश्यकच आहे. उत्तरेतल्या काही राज्यांत लोमोटिल या आपल्या नेहमीच्या औषधाला तिथे ते नशा म्हणून वापरले जात असल्याने बंदी आहे. त्यामुळे सगळीच औषधे सगळीकडे सहज मिळतील हा कदाचित भ्रमही ठरू शकतो. त्याचसोबत मुखवास, डिओडरंट, सनस्क्रीन लोशन, मॉईश्चराईजर हेसुद्धा सोबत असू द्यावे.

५. प्रवासाचं नियोजन
मोठ्या सुटीच्या वेळेस पूर्ण प्रवास आरखड्याच्या सर्व पत्ते-नंबरांसह एक बॅगेत आणि एक रोज फिरताना सोबत ठेवण्यासाठी अशा दोन प्रती ठेवाव्यात. रस्ता चुकणे, नेमका पत्ता न आठवणे हे हमखास घडते तेव्हा अनोळखी ठिकाणी आपल्या स्मरणशक्तीवर अधिक विसंबून न राहता छापील माहिती जवळ असल्यास अप्रिय घटना घडणार नाहीत. अर्थात गुगल मॅप्स आणि जीपीएसने हे रस्ते शोधायचे काम भलतेच सोपे करून ठेवलेय. कन्फर्मेशनचे एस. एम. एस. असल्यास ते आपल्या २-३ माणसांना फॉरवर्ड करून ठेवावेत. एखादेवेळेस चुकून ज्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये ही माहिती असते तिच्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्यास ही माहिती इतरत्र असल्यास वेळेस कामी येऊ शकते. तसेच सोबत न आलेल्या कुटुंबियांकडेही एक प्रत ठेवल्यास अधिक उत्तम. न जाणो कधी एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवायची आणि आपण परत पोचेपर्यंत घरच्यांच्या जीवात जीव नसायचा. काही वेबसाईट्स ट्रीप आयटेनरी तयार करण्यासाठी आराखडेही पुरवतात, त्यांचे साहाय्य घेतल्यास कमी वेळात सर्व काम सुरळीत होईल.

६. बॅग्ज आणि शॉपिंग
खरेदी हा कोणत्याही ट्रीपचा अविभाज्य भाग. काहीच नाही तर निदान त्या ठिकाणच्या वेगळ्या खास वस्तू मित्रपरिवारासाठी-आपल्या घरासाठी घेतल्याच जातात. तेव्हा निघतानाच बॅगांमध्ये थोडी थोडी जागा असलेली बरी नाहीतर नव्या बॅगेची खरेदी करावी लागते. तसेच वापरले गेलेले कपडे पण अधिक जागा घेतात.

७. जादाच्या कापडी/प्लास्टिक पिशव्या
बर्याच लोकांना वापरलेले व वापरायचे कपडे एकत्र केलेले आवडत नाहीत. पण निघताना नेमकी वापरलेले कपडे ठेवण्यासाठीची तरतूद करायला विसरले जाते. तेव्हा जितके दिवस बाहेर जाणार असाल त्याचा विचार करून योग्य त्या आकाराची कापडी/प्लास्टिकची पिशवी सोबत असू द्यावी. त्यायोगे न वापरलेले कपडे स्वच्छ राहतील आणि वापरलेल्या कपड्यांचा त्यांना दुर्गंध न लागून ते छान फ्रेश राहतील.

८. साबण आणि इतर सौंदर्यप्रसाधने
कपडे धुण्यासाठी साबणवडी घेण्यापेक्षा साबण पावडर घेतली तर ती ओली वडी बरोबर फिरवावी लागत नाही. तसेच आंघोळीचा ओला साबण बुळबुळीत होऊन तो सांभाळायला अवघड तर जातोच, उलट तो इतर कपडे खराब करण्याचा जास्त संभव असतो. शाम्पू-कंडीशनरच्या बाटल्या घेण्याऐवजी छोटे सॅशेज ठेवावेत. जिथे अगदीच शक्य नाही तिथे मॉईश्चराईजरच्या छोट्या बाटल्या प्लास्टिक कागदाने पॅकबंद कराव्यात जेणेकरून त्यांतून काही सांडले तरी इतर गोष्टी त्यामुळे खराब होणार नाहीत.
नाहीतर रॉससारखी पश्चात्तापाची वेळ येईल.

९. लहान मुलासोबत प्रवास करताना..
लहान मूल सोबत असेल तर उलटी वगैरे होऊन त्याचे स्वत:चे व आईबाबांचे कपडेही खराब होऊ शकतात. अशावेळेस प्रवासात नेहमीच बॅगा उघडून पुढचे सोपस्कार करता येणे शक्य नसते. यासाठी वरच्या बॅगेत बाळाचा एक ड्रेस, आईचा एक कुर्ता व बाबांचा एखादा टी-शर्ट ठेऊन द्यावा.

१०. ओले टिश्यूज
झाडावरून पक्ष्याने गुडलक दिले , कपड्यांवर काही सांडलं किंवा पराठ्यांचा रोल खाल्ला, की पटकन धु-पूस करण्याची गरज पडते. दरवेळेसच हाताशी पटकन पाणी असेल असं सांगता येत नाही. एखादा ओल्या टिश्यूजचं पाकीट सोबत असेल तर पटकन वेळ मारून नेता येते.
अगदी गाडीत बसल्याबसल्यादेखील आलेला कंटाळा घालवण्यासाठी किंवा काहीही पुसून घेण्यासाठी पाण्याची सांडलवंड न करता स्वच्छता राखण्याचा हा योग्य उपाय आहे..

११. फॉर्मल /पार्टी ड्रेस
भटकंती रोमॅंटिक असेल तर प्रश्नच नाही परंतु ऍडव्हेंचरस प्रवासात देखील फक्त शॉर्ट्स-टीशर्ट घालावेत असा काही नियम नाही. अचानक एखाद्या इंटरेस्टिंग ठिकाणी भेट द्यावी लागली किंवा छान मूड झालाच तर म्हणून एखादा फॉर्मल/पार्टी ड्रेस सोबत असू द्यावा. उगीच आणखी एक कपड्याचा जोड आणला असता तर काय बिघडले असते अशी नंतर चुटपुट लागायला नको.