काही दिवसांपासून एक कॅम्पेन सोशल मिडीयावर पसरू लागलं आहे. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिला. मग हा अत्याचार प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष. या सर्वांचा आवाज दाबला जातो किंवा त्यांना त्यांच्या जवळ गप्प राहण्यावाचून पर्याय नसतो. याच आवाजाला वाचा फोडण्यासाठी हा कॅम्पेन सोशल मिडीयावर पसरत आहे. ऍलिसा मिलानो अभिनेत्रीनं #MeToo हा ट्रेंड चालू केलाय.
जवळजवळ प्रत्येक स्त्री कोणत्या ना कोणत्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली असते. तुमच्या ओळखीच्या आणि कोणत्याही वयाच्या स्त्रीला विचारा, ती सांगेल तिला कोणकोणत्या घटनांना तोंड द्यावं लागतं ते.. अश्लील शेरेबाजी, अश्लील खाणाखुणा, मेसेजेस, गर्दीचा फायदा घेऊन नको तिथं हात लावणं, नको ते अवयव चिवळणं, सार्वजनिक वाहनात मुद्दाम हाताची घडी घालून स्त्री बसलेल्या बाजूला आपल्या दंडाआड लपलेली बोटं लांब करून तिचे उरोज दाबणं, फोनवर बोलतोय असं दाखवून तिच्या बाजूनं चालत नाही नाही ते ऐकवणं, भाजी घेताना वरून किंवा जिन्यावरून उतरणाऱ्या बायकांचे खालून फोटो काढणं.. यादी अनंत आहे हो..
आता हा ट्रेंड सुरू झाल्यापासून आपल्या भारतीय बायका फक्त आवाहन कॉपी पेस्ट करून #MeToo लिहित आहेत. त्यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची चाड नाहीय असं नाही पण कदाचित त्यांना पब्लिकली नक्की काय झालं होतं ते लिहायचं नाहीय.
हे लैंगिक अत्याचार फक्त स्त्रियांवरच होतात असं नाहीय. कित्येक पुरुषही याला बळी पडले आहेत. बरं, आपल्या फ्रेंड्स लिष्टीतल्या जवळजवळ झाडून सगळ्या बायका #MeToo लिहायला लागल्यावर पुरुष मंडळ काळजीनं हैराण झालंय. त्यामुळं पाठींबा म्हणूनही यात पुरुषांनीही सहभाग दाखवला आहे. आता बरेचजण आणि जणी असे विनयभंग करणारे पुरुष शोधून रिपोर्ट करत आहेत. हा लेख वाचेपर्यंत यातले काहीजण ब्लॉक झाले असतील किंवा सरकारी जावई बनून लॉकअपमध्ये पण गेलेले असतील..
हे पाहा काही लिंगपिसाट लोक आणि ते काय काय करतात.. हे इतके निर्लज्ज आहेत की आपल्या विकृत कामांचे फोटोज आणि व्हिडीओज पण त्यांनी सोशल मीडियावर टाकायला कमी केलं नाहीय.. या प्रोफाईलमधली नांवं आणि इतर महिती खोटी असू शकेल. पण त्यामागची प्रवृत्ती खरी आहे. आम्ही यांचे प्रोफाईल रिपोर्ट केले आहेत.. तुम्हीही कराल अशी आशा आहे.


