चादर ट्रेक, मुन्नार ते वृंदावनातली होळी!! या ---- फोटोंतून पाहा सुंदर आणि नयनरम्य भारत!! यांतली किती ठिकाणे तुम्ही पाहिली आहेत?

लिस्टिकल
चादर ट्रेक, मुन्नार ते वृंदावनातली होळी!! या ---- फोटोंतून पाहा सुंदर आणि नयनरम्य भारत!! यांतली किती ठिकाणे तुम्ही पाहिली आहेत?

आपला भारत विविधतेने नटलेला एक विशाल देश आहे. भारताइतकी विविधता इतर कोणत्याही देशात पाहायला मिळत नाही. नयनरम्य पर्यटन स्थळांतही देश कुठेच कमी पडताना दिसत नाही. मात्र काही ठिकाणांना प्रसिद्धी मिळते तर काही ठिकाणे कमी लोकप्रिय असतात. पण म्हणून त्यांचे सौदर्य कमी होत नाही. हे निसर्गसौंदर्य एखाद्या फोटोग्राफरच्या नजरेतून पाहिले तर हे फोटो इथलेच आहेत का प्रश्न पडेल. म्हणून आज आम्ही खास 17 फोटो घेऊन आलो आहोत जे तुम्हाला भारतीय संस्कृतीची नव्याने ओळख करून देतील.

हिमाचल प्रदेशातील चितकुल गाव किन्नौर जिल्ह्यात येते. भारतातील सर्वात स्वच्छ आणि ताज्या हवेचे ठिकाण म्हणून हे गाव ओळखले जाते.

गडी सागर हे राजस्थानातल्या जैसलमेर जिल्ह्यातले एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. इथे अनेक सुंदर मंदिरे आणि देवस्थाने आहेत. या गडीसागर तलावाला गडारिया तलाव देखील म्हणतात. हा तलाव जैसलमेरचे संस्थापक राजा रावल जैसल यांनी इ.स. ११५६ मध्ये बांधला होता. १९६५पर्यंत हा तलावच जैसलमेर गावचा मुख्य पाणी स्रोत होता.

माथेरानची मिनी ट्रेन सर्वानाच माहिती आहे. तामिळनाडूतही मेट्टुपलायम ते उधगमंडलमपर्यंत वाफेवर चालणारी मिनी ट्रेन धावते. हिचा मार्गही निसर्गाने वेढलेला अतिशय सुंदर आहे.

डिसेंबरमध्ये होणारा हॉर्नबिल फेस्टिव्हल हा भारतातील सर्वात रोमांचक सांस्कृतिक उत्सवांपैकी एक आहे. संपूर्ण नागालँडमधील जमाती आपली संस्कृती आणि परंपरा दाखवण्यासाठी खाली येतात. नागालँडमधील जमाती अनेक वेगवेगळ्या कलाकुसर दाखवतात. हा सोहळा पाहणे फार आकर्षक असते.

अरुणाचल प्रदेशच्या पूर्व हिमालयात सुमारे १२,००० फूट उंचीवर असलेले पेंगा टेंग त्सो हे एक सुंदर सरोवर आहे. इथले निर्मळ पाणी आणि भोवतालचा निसर्ग अगदी पाहण्यासारखा आहे. त्याच्या सभोवताली सर्व बाजूंनी बर्फाच्छादित पर्वत आहेत. हे ठिकाण अरुणाचल प्रदेशमधल्या तवांग शहरापासून सुमारे २३ किमी अंतरावर आहे.

हा आहे लडाखमधील प्रसिद्ध चादर ट्रेक. यात लोक गोठलेल्या झांस्करी नदीवर चालतात. चादर ट्रेक हा भारतातील सर्वात कठीण ट्रेकपैकी एक मानला जातो. यात तुम्हाला नदीवरून चालावे लागते, बर्फावर झोपावे लागते, तसेच गुडघाभर बर्फाच्या थंड पाण्यातून फिरावे लागते.

अरुणाचल प्रदेशातील झिरो पॉइंट चीन सीमेच्या अगदी जवळ आहे. इथल्या सुंदर पर्वतरांगा बघण्यासारख्या आहेत. याच्या उजवीकडे डोंगकिला शिखर आहे, तर डावीकडे खारगुला शिखर आहे.

ही आहे मध्य प्रदेशातील पंचमढी. हिला “सातपुडाची राणी ” असेही म्हणतात. हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्याने अतिशय लोकप्रिय आहे. इथली घनदाट जंगले, मादमाटे धबधबा, तलाव आणि लेणी प्रसिद्ध आहेत.

महाबलीपुरम हे मंदिराचे शहर आहे. हे शहर तामिळनाडूची राजधानी चेन्नईपासून ५५ किमी अंतरावर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर आहे. हे शहर भव्य मंदिरे, स्थापत्यकलेसाठी आणि समुद्रकिनाऱ्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथल्या मंदिरांतले दगडी कोरीव काम फार सुंदर आहे.

पूर्ण भारतात दिल्ली चाट प्रसिद्ध आहे. आणि त्यातही चांदणी चौकातल्या रस्त्यावर चाट खाल्ल्याशिवाय दिल्ली फिरल्यासारखी वाटत नाही. अनेक सेलेब्रिटी इथले चटकदार आणि वेगवेगळ्या प्रकारचे चाट आवर्जून खातात. मुख्यतः आलू टिक्की, पाणी पुरी ,दही चाट इथे आवर्जून खाल्ले जातात.

भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक म्हणून मेहरानगड किल्ला हा गणला जातो. हा किल्ला जोधपूर शहरातल्या कोणत्याही भागातून दिसतो. इथे अतिशय उंच भिंतींची अभेद्य तटबंदी आहे .किल्ला वास्तुरचनेचे अतिशय उत्तम उदाहरण आहे. किल्यामध्ये राजघराण्याचे संग्रहालय आहे व आजही जतन केलेला सोनेरी महाल आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये लाहौल, स्पीती हे निसर्गप्रेमींसाठी एक अद्भुत ठिकाण आहे. ट्रेकर्सच्या तर खास आवडीचे हे ठिकाण आहे. बौद्ध गोम्पा ४११६ मीटर उंचीवर एका टेकडीच्या टोकावर आहे. अनेक पर्यटक दरवर्षी इथे रोड ट्रीपही करत असतात.

मेघालयातील नोहकालिकाई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. याची उंची तब्बल ११०० फूट आहे. हा धबधबा ईशान्य भारतातील मेघालय प्रदेशातील पूर्व खासी हिल्समधील चेरापुंजीजवळ आहे. पावसाळा आणि नंतरही इथले दृश्य अतिशय सुंदर असते.

केरळमधील मुन्नार हे हिरव्या रंगाच्या ५० छटांनी न्हाऊन निघाल्यासारखे वाटते. मुन्नार हे पर्यटकांचे अतिशय लाडके हिल स्टेशन आहे. इथले चहाचे मळे सौंदर्यात अजून भर घालतात.

उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात तितक्याच सुंदर दिसणाऱ्या दल सरोवरात फिरणे कधीही कंटाळवाणे वाटत नाही. श्रीनगर येथील हे एक सुंदर सरोवर आहे. दल याचा अर्थ सरोवर असाच आहे. काश्मीरमधील हे दुसर्‍या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे.

वृंदावनातील होळी जगप्रसिद्ध आहे. इथल्या मन्दिरांमध्ये होळीचा उत्सव ४० दिवस आधीपासून सुरु होतो. इथे भक्तगण संपूर्ण भारतातून देवाबरोबर होळी खेळायला येतात. त्या काळात वृंदावनात एक वेगळाच उत्साह आणि रंग पहायला मिळतो.

हंपी हे भारताच्या कर्नाटक राज्यातले एक ठिकाण. UNESCO ने जगातील सर्वात महान स्थळांच्या यादीत त्याचा समावेश केला आहे. येथे पाचशेहून अधिक स्मारके आहेत. यामध्ये मंदिरे, राजवाडे, तळघर, पाण्याचे अवशेष, जुने बाजार, शाही मंडप, बुरुज, व्यासपीठ, खजिना अशा असंख्य इमारती आहेत. हे गाव एखाद्या खुल्या संग्रहालयासारखे आहे, इथे अनेकजण भेट देतात.

हे फोटो पहिले की आपल्या भारताबद्दल अजूनच प्रेम वाढते हो ना ? तुम्ही यातली कोणती स्थळे पहिली आहेत अवश्य सांगा आणि तिथले तुम्ही काढलेले फोटोही कमेंटबॉक्समध्ये शेअर करा!

शीतल दरंदळे