अवघ्या १६ वर्षीय प्रज्ञानंदने रचला इतिहास! जगज्जेत्या कार्लसनवर मिळवला जोरदार विजय

अवघ्या १६ वर्षीय प्रज्ञानंदने रचला इतिहास! जगज्जेत्या कार्लसनवर मिळवला जोरदार विजय

वयाच्या १६ व्या वर्षी मुलं १० वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु भारताचा १६ वर्षीय बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंद याने इतिहासाला गवसणी घातली आहे. त्याने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू मॅग्रस कार्लसनवर जोरदार विजय मिळवला आहे. हा कारनामा त्याने एअरथिंग्स मास्टर्स या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेत केला आहे.

प्रज्ञानंदला हा पराक्रम करण्यासाठी ३९ चाली खेळाव्या लागल्या. प्रज्ञानंद ८ फेऱ्या झाल्यानंतर ८ गुणांसह १२ व्या क्रमांकावर आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये त्याची खेळाची गती मध्यम होती. याच मध्यम गतीच्या साहाय्याने त्याने जगज्जेत्या मॅग्रस कार्लसनवर विजय मिळवला. भारतीय जीएम आठ फेऱ्या झाल्यानंतर १२ व्या क्रमांकावर आहे. प्रज्ञानंदची या स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर, त्याला लेव ओरियनविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले होते. तर ४ लढतीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच २ लढती बरोबरीत सुटल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी कार्लसन आणि रशियाचा नेपोमनियान हे दोघेही विश्व अजिंक्यपद स्पर्धेत आमने सामने आले होते. या सामन्यात कार्लसनने विजय मिळवला होता. तसेच पराभूत होणारा नेपोमनियान हा सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत १९ गुणांसह अव्वल स्थानी आहे. या स्पर्धेत विजय मिळवणारा खेळाडू ३ गुणांची कमाई करतो, तर सामना बरोबरीत सुटल्यास १ गुण मिळत असतो. 

प्रज्ञानंदने वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी विश्वनाथ आनंद यांचा विक्रम मोडून काढला होता. त्याने २०१८ मध्ये ग्रँडमास्टरचा किताब पटकावला होता. असा कारनामा करणारा तो सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला होता. यापूर्वी विश्वनाथ आनंद यांनी वयाच्या १८ व्या वर्षी हा किताब पटकावला होता.