दिनविशेष: या नाटकांनी जागतिक रंगभूमी गाजवली!!! तुमचं यांतलं आवडतं नाटक कोणतं?

लिस्टिकल
दिनविशेष:  या नाटकांनी जागतिक रंगभूमी गाजवली!!! तुमचं यांतलं आवडतं नाटक कोणतं?

ज्या रंगभूमीवर बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर, श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, भक्ती बर्वे इत्यादी दिग्गज कलाकार आपल्या दैवी गुणांनी वावरले आणि मराठी रंगभूमीला जगभरात पोहोचवलं, त्या रंगभूमीचा आज दिवस. मराठी रंगभूमीला मोठी परंपरा आहे. काही मराठी नाटकांची नोंद जागतिक पातळीवर घेतली गेली तर काही जागतिक कलाकृतींना मराठीनं आपलं मानलं. आज आम्ही घेऊन आलो आहोत जागतिक रंगभूमीवर गाजलेली काही नाटकं. यांतली काही तुम्ही नक्कीच पाहिली असतेल. नसतील, तर त्यातली बरीच नाटकं आज युट्यूबवरही उपलब्ध आहेत.

  आजच्या या जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने चला बघूया जागतिक रंगभूमीवर गाजलेली आणि जागतिक रंगभूमीवरून प्रभावित झालेली काही निवडक नाटकं. यातलं तुमचं आवडतं नाटक कोणतं?

अजब न्याय वर्तुळाचा

अजब न्याय वर्तुळाचा

ब्रेख्त या जर्मन लेखकाचा `कॉकेशियन चॉक सर्कल' या नाटकाचा अनुवाद 'अजब न्याय वर्तुळाचा' या नावानं आरती प्रभू यांनी केला. हे नाटक मराठी रंगभूमीवर आणण्यासाठी त्यांनी मूळ नाटकाचं रुपांतर तमाशा शैलीत केलं. त्याकाळातलं एक गाजलेलं नाटक म्हणून अजब न्याय वर्तुळाचा या नाटकाकडं बघितलं जातं.

तीन पैशाचा तमाशा

तीन पैशाचा तमाशा

हे नाटक म्हणजे पु. ल. देशपांडे यांनी केलेलं ब्रेख्तच्या 'थ्री पेनी ऑपेराचं' स्वैर रुपांतर आहे. नाटकात बदल करताना पुलंनी आपल्या खास शैलीचा वापर केलाय. त्यामुळं होतं काय, नाटक पाहताना ते एक स्वतंत्र नाटक असल्याचा भास होतो.

घाशीराम कोतवाल

घाशीराम कोतवाल

विजय तेंडूलकरांची एक अजरामर आणि अभिजात नाट्यकृती. सुरुवातीच्या काळात काही तथाकथित बुद्धीजीवी माणसांनी नाटकाला प्रचंड विरोध केला, पण आपल्यातील वेगळेपणामुळं आणि बांधणीमुळं नाटकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. हे नाटक म्हणजे इतिहास नसून इतिहासावर बेतलेलं आहे

सखाराम बाईंडर

सखाराम बाईंडर

हे ही विजय तेंडूलकरांचंच अजून एक गाजलेलं आणि तेवढंच वादग्रस्त नाटक. यातील काही दृश्यांमुळे नाटकावर दबाव आणून नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. पण या अडथळ्यांना पार करून सखाराम बाईंडरचे हजारो प्रयोग झाले. याचे कारण म्हणजे नाटकातील वास्तव आणि स्फोटकता.

काही दिवसांपूर्वी ललित कला केंद्रातल्या मुक्ता बर्वे आणि संदीप पाठक या माजी विद्यार्थी मंडळींनी हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आणलं. या नव्या रूपातील नाटकाचे पाच प्रयोग मुंबई आणि पुण्यात करण्यात आले.

विजय तेंडूलकरांचं आणखी एक ’शांतता कोर्ट चालू आहे’ हे ही तितकंच स्फोटक आणि जबरदस्त नाटक. या नाटकाची सुरूवात दिवंगत सुलभा देशपांडेंपासून झाली आणि त्याचे काही प्रयोग नंतर रेणुका शहाणेसोबतही झाले. आश्चर्य वाटेल, पण या नाटकाचे काही प्रयोग पाकिस्तानातही झाले आहेत, आणि तेही पात्रांची नावं न बदलता!!

वेटिंग फॉर गोदो

वेटिंग फॉर गोदो

सॅम्युअल बेकेट या आयरिश लेखकाचं हे एक अस्तित्ववादी नाटक. या नाटकानं संपूर्ण जगाला भुरळ घातली. जगभरात अनेक भाषांतून याचे प्रयोग झाले आहेत.  या नाटकाचं मराठीतही भाषांतर झालंय. या नाटकातलं कथानक म्हणजे दोन माणसे एका गोदो नावाच्या व्यक्तीची वाट बघत आहेत.

ती फुलराणी

ती फुलराणी

’माय फेअर लेडी’ या अमेरिकन सिनेमाचं रूपांतर पु. ल. देशपांडेंनी ’ती फुलराणी’ या नावानं रंगमंचावर आणलं. मूळ सिनेमा बहारदार तर आहेच आणि ऑड्री हेपबर्न या गाजलेल्या अभिनेत्रीनं त्याला अजरामर केलंय. अशा नाट्यमय रूपांतराला तितक्याच जबरदस्त लेखणीचा आधार हवा होता आणि तो आपल्या आनंदयात्री पुलंनी दिला. वेगवेगळ्या विभागांतल्या आणि लहेजातल्या मराठीचा खुबीनं वापर करून त्यांनी पात्रं रंगवली आहेत.

भक्ती बर्वे इनामदार यांनी पहिली फुलराणी साकारली आणि आजही रसिकांच्या मनात ती घर करून आहे.

बेईमान

बेईमान

बेईमान हे 'बेकेट‘ या फ्रेंच नाटकाचा वसंत कानेटकरांनी केलेला अनुवाद आहे. ४० वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं होतं. या नव्या रुपात शरद पोंक्षे, शीतल क्षीरसागर आणि तुषार दळवी मुख्य भूमिकेत होते.

नटसम्राट

नटसम्राट

या नाटकाबद्दल बोलावं तितकं कमीच. वि. वा. शिरवाडकरांची एक अजरामर कलाकृती म्हणून नटसम्राटकडे पाहिलं जातं. श्रीराम लागूंनी अप्पा बेलवलकरांच्या भूमिकेला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. डॉक्टर लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी, गिरीश देशपांडे, नाना पाटेकर अश्या दिग्गजांनी बेलवलकरांची भूमिका तेवढ्याच सामर्थ्याने वठवली.

नाटकावर आधारित नाना पाटेकारांची भूमिका असलेला सिनेमा २०१६ साली आला आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांनी या कलाकृतीला डोक्यावर घेतलं.