अमानुषतेचा कळस : आंतर्जातीय विवाहाच्या रागात गर्भवतीला जिवंत जाळले !!!

अमानुषतेचा कळस : आंतर्जातीय विवाहाच्या रागात गर्भवतीला जिवंत जाळले !!!

अनेक वर्षांपूर्वी आपण म्हणजे आज जे तरुण मुलांचे आईबाप आहेत त्यांनी 'एक दुजे के लिये' बघितला. त्या नतरच्या पिढीनं 'कयामत से कयामत तक' बघितला. आपल्या पिढीने ‘सैराट’ पाह्यला. मराठी सैराट कन्नडमध्ये पण आला. हे सर्व सिनेमे बघून बाहेर पडताना प्रेक्षकांचे डोळे पाण्याने डबडबले होते. पण हे सगळं काही तात्पुरतंच! पुढच्या काही तासांत आपण पुन्हा एकदा जात, धर्म आणि वंशाच्या दलदलीत पुन्हा फसत जातो. ही दलदल इतकी भयंकर आहे की वारंवार ‘सैराट’ घडतच राहातं. अशीच एक घटना घडलीय कर्नाटकातील विजयपुरात.

घटनेचं रूप साधारण सैराट सारखंच, फक्त इथे धर्माचा फरक आहे मंडळी. बानू बेगम या २१ वर्षाच्या ‘मुस्लीम’ मुलीला तिच्याच घरच्यांनी एका दलित मुलासोबत लग्न केल्याच्या रागावरून जिवंत जाळलंय. ती २ आठवड्यांपूर्वी ‘सायबाना कोन्नुर’ या तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यांनी लग्न देखील केलं होतं. मुलगा वाल्मिकी समाजातील (दलित) असल्यानं बानू बेगमच्या घरच्यांचा तिच्यावर प्रचंड राग होता.

एका आठवड्यापूर्वी ते आपल्या घरी जेव्हा परतले तेव्हा मुलीच्या घरच्यांनी तिला जिवंत जळलं. यात सायबाना कोन्नुर याला देखील जबर दुखापत झालीय. मुख्य बाब म्हणजे बानू बेगम ही मरतेवेळी गर्भवती होती. तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलासोबत तिला जिवंत जाळण्यात आलंय.

या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात तर घेतलं, पण खोट्या प्रतिष्ठेपाई बानू बेगम आणि तिच्या मुलाचा जीव गेला तो गेलाच.

शेवटी प्रश्न उरतोच :

आपण ‘सैराट’ बघून फक्त झिंगाट होऊन नाचलो की त्यातून काही शिकलो ?