आपण मेल्यावर आपल्या फेसबुक अकाउंटचं काय होणार भाऊ? घाबरू नका... हे वाचा...

आपण मेल्यावर आपल्या फेसबुक अकाउंटचं काय होणार भाऊ? घाबरू नका... हे वाचा...

तर मंडळी,  फेसबुकच्या खोट्या खोट्या जगात सुखाने जीवन जगणाऱ्या तमाम फेसबुकवासीयांना चिंतेत पाडणारा आणखी भोचक सवाल! एखाद्याच्या मृत्युनंतर त्याच्या फेसबुक अकाउंटचं काय होणार?

एखाद्याच्या कशाला म्हणताय? आपलंच घ्या की.. आपणही एकदिवस गुल होणारच आहोत, मग आपल्या या लाडक्या अकाउंटचं कसं काय होणार? पण चिंता करू नका. फेसबुकनं आपल्यासाठी एवढं मोठं आभासी जग निर्माण केलंय म्हटल्यावर त्यातल्या सगळ्या प्रश्नांवर व्यवस्थित सोल्युशन पण असणारच. मग चला बघूया या प्रश्नावर त्यांनी काय तोडगा काढलाय....

स्त्रोत

आज घडीला १९० कोटींपेक्षा अधिक लोकं फेसबुकवर अ‍ॅक्टिव्ह आहेत मंडळी!! पण रोज यांच्यातल्या शेकडो लोकांचा काहीना काही कारणाने मृत्यू होत असणार. मग या मृत लोकांचं फेसबुक अकाउंट तसंच कायम पडून राहतं का? तर नाही. फेसबुककडून त्या अकाऊंटला मेमोरियलाईज केलं जातं. म्हणजेच ते अकाउंट डिलीट न होता तसंच जपून ठेवलं जातं. जेणेकरून त्या अकाउंटवरील पोस्ट्स आणि फोटोज बघून लोक त्या मृत व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देतील. अशा मेमोरियलाईज केलेल्या व्यक्तीच्या अकाऊंटवर रिमेम्बरींग हा शब्द लावला जातो. म्हणजे थोडक्यात आपण त्या व्यक्तीला मिस करतोय.

पण फेसबुकला कसं कळतं की ती व्यक्ती मृत झालीये? कळत नाही तर तर कळवावं लागतं. यासाठी आपल्याला सिक्युरिटी सेटिंगमध्ये लिगसी कॉन्टॅक्ट नावाचा पर्याय मिळतो. तिथं आपण एखाद्या नातेवाईक किंवा फेसबुक फ्रेन्डला आपल्या अकाऊंटचा वारसदार बनवून ठेवू शकतो. म्हणजे आपल्या मृत्युनंतर आपलं अकाउंट तीच व्यक्ती हॅन्डल करेल. काळजी करू नका. त्या व्यक्तीला तुमचे मेसेज वाचण्याची किंवा अकाऊंटवरून काही पोस्ट करण्याची परवानगी नसेल. पण प्रोफाईल फोटो बदलणं, फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारणं, या गोष्टी त्याला हॅन्डल करता येतील. लिगसी कॉन्टॅक्टच्या पेजवरच खाली एक लिंक दिली गेलीय. तिथं एक फॉर्म भरून आपण एखादी व्यक्ती मृत झाल्याचं फेसबुकला कळवू शकतो. पण यासाठी त्याचं डेथ सर्टीफिकेट सादर करावं लागेल. ते वेरीफाय करून मग फेसबुक त्या व्यक्तीचं अकाऊंट मेमोरियलाईज करेल.

पण तुमच्या मनात मृत्युनंतर तरी फेसबुकचं व्यसन सुटूदे, अशी सुप्त सदिच्छा असेल तर त्याचाही विचार फेसबुकने केलाय. लिगसी कॉन्टॅक्ट च्या पेजवरच रिक्वेस्ट अकाउंट डिलीशन नावाचा पर्याय आहे. तो सिलेक्ट केलात की तुमच्या मृत्युनंतर तुमचं अकाउंटही डिलीट होईल. फक्त त्या वारसदाराने फेसबुकला डेथ सर्टिफिकेट सबमीट केलं पाहिजे.

 

बघा मंडळी, मेल्यावर मला कोण आठवतंय म्हणू नका, शेवटी फेसबुकनेच तुमचा विचार केलाय. त्यामुळे आता राडा करणारा पिंट्या, हवा करणारा छोट्या, पाटलांचा लाडका गोट्या, स्टेटस किंग सदाशिव, सेल्फी किंग पक्या, अशी तमाम मंडळी फेसबुकवर अमर राहणार!!