पुण्याच्या १४ वर्षांच्या मुलाने कोरोना सुरक्षा किट तयार केलंय. कोण आहे तो?

लिस्टिकल
पुण्याच्या १४ वर्षांच्या मुलाने कोरोना सुरक्षा किट तयार केलंय. कोण आहे तो?

आताची मुलं दिवसभर गेम खेळत बसतात आणि युट्यूबवर व्हिडिओ बघत असतात या तक्रारीत आता नवीन काही राह्यलं नाहीय. पण या सर्वांमध्ये देखील काही मुले वेगळी डोक्यालिटी लावून काहीतरी भन्नाट करून दाखवत आहेत. आम्ही वेळोवेळी अशा छोट्या मुलांच्या मोठ्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आज अशाच एका मुलाने केलेल्या कारनाम्याची गोष्ट बघूया...

आदित्य पाचपांडे हा चिंचवडमध्ये राहणारा १४ वर्षांचा मुलगा. त्याचा रोल मॉडेल कोण आहे? तर एलॉन मस्क. तर हा एलॉन मस्कसाहेब मंगळावर दुसरी पृथ्वी निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. अर्थात ही एक गोष्ट झाली. पण तांत्रिक बाबींत डोळे दिपून जावे अशा अनेक गोष्टींवर एलन मस्क नेहमीच काम करत असतात.

या आदित्यने मस्कला नुसतेच आदर्श मानले नाही, तर त्याच्याप्रमाणेच अनेक गोष्टींमध्ये हा गडी अफलातून कामं करत असतो. इन्ड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये ९ वीत शिकत असलेल्या आदित्यला त्याने तयार केलेल्या सुरक्षा किटसाठी पेटंट मिळाले आहे. या किटमुळे कोविडपासून संरक्षण करण्यासाठी UV-C किरणांचा वापर यावर त्याला पेटंट मिळाले आहे.

आता आदित्यला कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च - सेंटर मॅकनिकल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने एक पत्र लिहिले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की आदित्यने बनवलेले सॅनिटाईजर बॉक्स UV-C स्टरिलायझेशनच्या कामासाठी वापरले जाऊ शकतात.

आदित्यचे वय कमी आहे आणि बुद्धीमत्ता अफाट आहे हे तर त्याच्या या शोधावरून दिसून येतेच. पण हा मुलाचे मनदेखील मोठे आहे. त्याने बनवलेले सॅनिटायझर बॉक्स त्याने दादरच्या भाजीपाला बाजारात मोफत वाटले आहेत. त्याचे हे सॅनिटायझेर बॉक्सेस खूप महत्त्वाचे आहेत. लोक स्वत:ला, कपडे वगैरे सॅनिटाइज करतात, पण भाजीपाला कसा सॅनिटाईझ करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे असतो. अल्कोहोलमिश्रित सॅनिटायझरने भाजीपाला निर्जंतुक करणं हे काही यावरचं उत्तर होऊ शकत नाही.

आदित्य सांगतो की लॉकडाऊनदरम्यान त्याच्या डोक्यात ही आयडिया आली. मग काय, त्याने काम सुरू केले आणि कीट निर्माण जहली. CSIR-CMERI च्या पत्रानंतर आदित्य आणखी १००० असे किटस् बनवून गरीब आणि गरजू लोकांना वाटणार आहे. त्याचं करावं तितकं कौतुक थोडं आहे.