पुष्पा : द राईज पार्ट १ या अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांनी इन्स्टा रील्स आणि युट्युब शॉर्ट्स अगदी भरभरून वाहत आहे. या गाण्यांच्या तालावर थिरकण्याचा मोह होणे आणि त्याची नक्कल करणे सोशल मिडीयाच्या जमान्यात सध्याचा एक ट्रेंड आहे. पण या चित्रपटात अल्लू अर्जून म्हणजेच पुष्पा ज्या प्रकारे पोलिसांना चुना लावून रक्तचंदनाची तस्करी करतो तसेच मी पण करेन म्हटले तर शक्य आहे का? अजिबात नाही.
एकीकडे लोक या चित्रपटातील डायलॉगची नक्कल करत आहेत, तर दुसरीकडे कर्नाटकातील एका पठ्ठ्याने चक्क पुष्पाच्या स्मगलिंग स्टाईलची नक्कल करून करोडो रुपयांच्या रक्तचंदनची तस्करी करण्याचा प्रयत्न केला आहे. बेंगळूरूमधल्या यास्मिन इनायतुल्लाह खान नावाचा ट्रक ड्रायव्हर पुष्पा होण्याच्या प्रयत्नात असतानाच महाराष्ट्र पोलिसांनी मात्र त्याच्या या स्वप्नांचा चक्क चुराडा केला आहे.
पुष्पा द राईज पार्ट १ हा चित्रपट रक्तचंदनाची तस्करी आणि त्यामागची करोडो रुपयांची उलाढाल यावर आधारित आहे. तुम्ही या चित्रपटात पाहिलेच असेल की एक सामान्य मजूर आपल्या हुशारीने कसा संपूर्ण टोळीचा प्रमुख बनतो. यासाठी त्याला कधी पोलिसांचा मारही खावा लागतो तरी कधी पोलिसांच्या डोळ्यात धूळही फेकावी लागते. पोलिसांना चुकवून चंदन नेण्यासाठी त्याने दुधाच्या ट्रकमधून तर कधी फळांच्या ट्रकमधून माल बाहेर नेला. पोलिसांना कळलं देखील नाही की आपण कशाप्रकारे फसवले गेलो आहोत.

