आजची कथा आहे राणी तेउताची. ही युरोपातल्या एका छोट्याशा राज्याची खरंतर राजमाता. तिचा जन्म कधी झाला याचीही माहिती नाही. इसवीसन पूर्व २३१ मध्ये मृत्यू पावलेल्या या छोट्या राज्याची राणी बलाढ्य रोमन साम्राज्यासमोर नमली नाही, तिचा मृत्यूही तिच्या जनतेसाठी इतका प्रेरणादायी होता की त्यांनीही रोमन सम्राटांसमोर कधीच मान झुकवली नाही. जाणून घेऊया या धैर्यशाली शूर राणी तेउताबद्दल!!
युरोपाचा नकाशा पाहिलात तर एका बाजूला इटली आणि दुसऱ्या बाजूला जुना युगोस्लाव्हिया आहे. आता त्याचे तुकडे पडून स्लोव्हेनिया, क्रोएशिया, बॉस्निया -हर्झगोवेना, सर्बिया, मॅसेडोनिया असे बरेच तुकडे झाले आहेत. जुन्या युगोस्लाव्हियाच्या शेजारी अल्बेनियाही आहे. या दोन मुख्य भूभांगामधल्या चिंचोळ्या दिसणाऱ्या भागात आहे ॲड्रिॲटिक समुद्र. या ॲड्रिॲटिक समुद्राच्या पश्चिमेला आणि बाल्कन बेटाच्या वायव्येच्या प्रांतात कधीकाळी इलीरीयन्स या इंडो-युरोपियन लोकांचा वावर होता. यांचे स्वतःचे राज्य होते. डान्यूब नदीपासून दक्षिणेला ॲड्रिॲटिक समुद्रापर्यंत आणि तिथून पूर्वेकडे सार डोंगर रांगापर्यंत म्हणजेच कोसोवो देशापर्यंत त्याचे हे राज्य विस्तारले होते. या राज्यात असंख्य जमाती होत्या आणि या प्रत्येक जमातीची स्वतःची प्रशासन व्यवस्था होती. अशा अनेक जमाती आणि त्यांचे प्रमुख एकत्र येऊन त्यांनी हे राज्य वसवले होते. इलीरीयन साम्राज्याची राजधानी होती स्कोड्रा, म्हणजे आताचे अल्बेनियामधले श्कोडेर शहर. या राज्यात सुमारे तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात अग्रॉन नावाचा एक खूप मोठा राजा होऊन गेला. अग्रॉन हा माणूस कमी आणि राक्षसच जास्त वाटायचा. साम्राज्य विस्ताराची त्याची हावच तशी होती. हा अग्रॉन राणी तेउताचा पती होता.



