आपल्याकडे इंग्लिश बोलता येणे ही अजूनही मोठ्या नोकरीवर असलेल्या लोकांची गोष्ट वाटते. अशावेळी एखादा साधारण मनुष्य एखाद-दुसरा शब्द इंग्लिशमध्ये बोलला तरी लोकांना आश्चर्य वाटते. पण बंगळुरूमध्ये चक्क कचऱ्यातून कपडे उचलणारी एक बाई अतिशय स्पष्ट आणि छान इंग्लिश बोलते. तसं इंग्रजी बोलता येणे, त्यातही आपल्या व्यवसायाचं सोडून रोजच्या गोष्टी अस्खलित इंग्रजीतून मांडणे हे भल्याभल्यांना बरेचदा जमत नाही.
बंगळुरूच्या सदाशिवनगर भागात कचऱ्यातून कपडे उचलणारी ही महिला स्वतःचं नाव सिसिलिया मार्गारेट लॉरेन्स असे सांगते. ही महिला इन्स्टाग्रामवर रिल्सच्या माध्यमातून वायरल झाली आहे. बंगळुरूच्या रस्त्यांवर शाचीना हेगर यांनी तिला इंग्लिश बोलताना पाहिले आणि हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.
या व्हिडिओत ती साध्या हिरव्या साडीत खांद्यावर एक पिशवी अडकवून स्वच्छ इंग्लिश बोलताना दिसते. याआधी तिचा इंग्लिश गाणे गात असतानाचा पण व्हिडिओ वायरल झाला होता. तिने आपण आधी ७ वर्ष जपानमध्ये राहिले असल्याचे सांगितल्याने तिच्याबद्दलचे गूढ अधिकच वाढले आहे. तिचा एकंदरीत अविर्भाव आणि अस्खलित इंग्रजी पाहून थक्क व्हायला होते.
तिचा हा व्हीडिओ वायरल झाल्यावर अनेकांनी तिची माहिती मागितली आहे. जेणेकरून इतक्या हुशार महिलेला आर्थिक मदत करता यावी. बंगळुरूमधील अनेकांनी आपण या महिलेला आधी पाहिले असून ती इतकी छान इंग्लिश बोलते याची माहिती नव्हती असे सांगितले आहे.
ही गोष्ट इथे संपत नाही. तिच्या नावाचे एक इन्स्टाग्राम पेजही आहे.ते पेज बघितले तर ती एखादी सेलेब्रिटी असल्याचे दिसेल. अनेक मोठ्या प्रकाशकांनी तिचे फोटो आणि माहिती छापली. या पेजच्या वेबसाईटवर मुक्ती आणि शहाणपणाचा स्थानिक चेहरा असे तिचे वर्णन आहे.
काही असो, बाईंचं इंग्रजी आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वासदोन्हीही तितकंच भन्नाट आहे!!
