"यश, पैसा , प्रगती करायची असेल तर शहरात जा." असा सल्ला तरुण पिढीला दिला जातो. पण आज आम्ही अशा युवकाची कहाणी सांगणार आहोत ज्याने खेडेगावात शिकून थेट फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलगा राजू केंद्रे याने हे यश मिळवून बुलढाण्याचे नाव उंचावले आहे.
राजू केंद्रे महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थांना उच्च शिक्षणासाठी मदत करतात. त्यासाठी त्यांनी एकलव्य फाउंडेशनची स्थापना केली. जी मुले क्षमता असूनही परिस्थिती नसल्यामुळे पुढे शिक्षण घेऊ शकत नाहीत अशांना मदत करणे हा एकलव्य फाउंडेशन स्थापन करण्यामागचा उद्देश होता. विशेषतः खेड्यात अनेकजण माहिती नसल्याने किंवा योग्य मार्गदर्शन नसल्याने इच्छा असूनही पुढे शिकू शकत नाहीत. या सर्व विद्यार्थ्यांसाठी अवघ्या विशीत राजू यांनी एकलव्यची सुरुवात केली. राजू केंद्रेंनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास फेलोशिपमध्येही काम केलेले आहे. त्यांनी पारधी समाजासाठी विकासकामे केली आहेत. ग्रामीण भागात आजही अनेकजण उच्च शिक्षणासाठी लागणारी किंवा स्पर्धापरीक्षासाठी लागणारी पुस्तके मिळवू शकत नाहीत. त्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी पुणे, ठाणे, औरंगाबाद, यवतमाळ, अमरावती, मुंबई येथून ३० हजारांहून अधिक पुस्तके गोळा केली आणि ती ग्रामीण भागात ग्रंथालय उभी राहण्यासाठी वितरीत केली.
राजू केंद्रेंचा जन्म महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या पिंपरी खंदारे या छोटयाश्या खेड्यातला. कुटुंबात राजू हे शिकलेली पहिलीच व्यक्ती आहेत. राजूंचं शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. जिल्हाधिकारी होण्यासाठी त्यांनी पदवीच्या शिक्षणासाठी पुणे गाठले. पण पुण्यात त्यांना मार्गदर्शक मिळाला नाही. फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश करायचा होता, पण प्रवेशाची तारीख उलटून गेली होती. कुठेही प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी बीपीओमध्ये नोकरी करायचे ठरवले. पण तिथेही त्यांना ती भाषा आत्मसात करणे जमले नाही. शेवटी त्यांनी पुणे सोडले आणि परत गावी गेले. तिथे त्यांनी मुक्त विद्यापीठाअंतर्गत पुढचे शिक्षण सुरू ठेवले. २०१२ ला मुक्त विद्यापीठात शिकत असताना राजू यांना मेळघाट या आदिवासी भागात जाण्याची संधी मिळाली. मेळघाट मित्रच्या गटासोबत त्यांनी दोन वर्ष पूर्णवेळ काम केले.

