२० वर्षे चाललेली 'CID' मालिका का बंद पडली यावर शिवाजी साटम काय म्हणतात ते वाचा!!

लिस्टिकल
२० वर्षे चाललेली 'CID' मालिका का बंद पडली यावर शिवाजी साटम काय म्हणतात ते वाचा!!

सीआयडी हा सोनी टीव्हीवर एकेकाळी चांगलाच लोकप्रिय असलेला शो होता. आपल्यापैकी प्रत्येकाला या शो कधी नसी कधी तरी आवडला असेल. १९९८ साली सुरू झालेला हा शो तब्बल २० वर्ष सलग सुरू होता. २०१८ साली हा शो अचानक बंद झाला. पण आजही या शोचे काही व्हिडिओ व्हायरल होतात. तसेच शोमधील प्रत्येक व्यक्तीचे नाव आजही आपल्याला माहीत आहे.

सीआयडीचे मिम्स तर भन्नाट असतात. काहीतरी घडले की 'दया कुछ तो गडबड है' हा एसीपी प्रद्युम्न यांचा डायलॉग, तसेच त्यांचाच 'तुम्हें तो फासी होगी', 'दया, तोड दो दरवाजा' असे डायलॉग हे मिम्समधून दिसत असतात. तसे बघायला गेले तर स्मार्टफोन आले तेव्हापासून टीव्ही टीआरपीला उतरती कळा लागली आहे.

सीआयडीची लोकप्रियता बरीच वर्षे टिकून होती. प्रत्येक एपिसोडमध्ये नवी स्टोरी, नवे व्हिलन आणि खिळवून ठेवणारा घटनाक्रम यामुळे हा शो लोकांच्या मनात नेहमीच घर करून होता. पण अचानक असे काय झाले की ज्यामुळे सीआयडी बंद झाले याचे उत्तर अनेकांना मिळत नाही.

याचे उत्तर स्वतः एसीपी प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम यांनी दिले आहे. एके ठिकाणी ते सांगितले आहे, "त्या दिवशी शुक्रवार होता आणि आम्हाला सांगण्यात आले की सोमवार हा शोचा शेवटचा दिवस असेल. या गोष्टीची पुरेशी माहिती प्रोड्युसर्सना देखील नव्हती."

तो निर्णय पूर्णपणे चॅनेलचा होता. साटम असेही नोंदवतात की शो प्रसारित व्हायची वेळ बरेचदा बदलली जात होती. तेव्हा आम्हाला काहीतरी घडत आहे हे कळत होते. कारण आधी १० ची वेळ १०.३० झाली, नंतर तीच वेळ १०.४० आणि मग थेट रात्री ११ वर गेली.

कोरोना आल्यावर सीआयडीचे जुने एपिसोड पुन्हा दाखवण्यात आले. मात्र नव्याने काही ही सिरीयल सुरू होऊ शकली नाही. साटम सांगतात की, प्रोड्युसर हा शो नव्या फॉरमॅटमध्ये पुन्हा प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याची चर्चा करत आहेत. मात्र याबद्दल देखील निश्चित असे काही सांगता येणे कठीण आहे.

सीआयडी जर नव्या फॉरमॅटमध्ये लोकांपुढे येत असेल तर लोकांना आनंदच होईल, पण तरीही जुन्याची सर त्याला येईल का हे सांगणे कठीण आहे.