'दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिये', ही हिंदी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली, वाचली असेल. एकाच वेळी शेकडो हजारो लोकांना चुना लावून पोबारा करणाऱ्या अतिहुशार, अतिचाणाक्ष लोकांच्या कथा वाचल्यावर ही म्हण किती सार्थ आहे, यावर विश्वास बसतो. विश्वास ठेवा, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील लोक याला अपवाद नाहीत.
ही घटना काही खूप जुनी नाही. अगदी अलिकडच्या, इंटरनेट फोफावलेल्या काळातली ही घटना. हे घडले २०१३ ते २०१७ या काळात, शहर होतं न्यूयॉर्क! न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागातले उच्चभ्रू लोकही अशाच एका ठग महिलेकडून फसवले गेले. लोकांच्या विश्वासाचा, त्यांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या अवाजवी स्वप्नांचा, अपेक्षांचा गैरफायदा घेऊन आपली झोळी भरणाऱ्या ॲना सोरोकिन नावाच्या अवघ्या १९ वर्षांच्या मुलीने लोकांना २,७५,०००डॉलर्सचा चुना लावला. साधेभोळे गरीब लोक एकवेळ अशा एखाद्या जाळ्यात अडकून फासले तर ठीक आहे. पण स्वतःला उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि समाजाचे उध्वर्यू समजणारे लोकही अशाप्रकारच्या दिखाव्याला फसतात म्हणजे काय? आश्चर्यच ना?
ॲनाच्या या कारानाम्यावर बेतलेली एक वेबसिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. साधीसरळ असल्याचा आव आणणाऱ्या या ॲनाने न्यूयॉर्कच्या बड्याबड्या लोकांना आपल्या जाळ्यात किती अलगद फसवलं हे पाहून आपल्यालाही धक्का बसेल.




