भारतीय संस्कृतीतील काही संकल्पना जगभर वापरल्या जात असल्याचे पाहायला मिळते. यात आयुर्वेद आणि योगापासून ‘स्वस्तिक’ सारख्या शुभचिन्हांचाही समावेश आहे. हिंदू धर्मासोबतच बौद्ध आणि जैन धर्मातही या चिन्हाला खूप महत्वाचे स्थान आहे. भारतात अजूनही लग्नपत्रिकेपासून घरांच्या भिंतीवर आणि मंदिरांतही हे चिन्ह कोरलेले दिसेल. स्वस्तिक चिन्ह हे कल्याणकारी आणि शुभंकर मानले जाते. स्वस्तिकमध्ये सूर्य, इंद्र, वायु, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णु, ब्रह्मदेव, शिवपार्वती, श्रीगणेश अशा अनेक देवतांचा वास असतो. स्वस्तिक म्हणजे शांती, समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक. म्हणूनच कोणत्याही शुभकार्यात आधी स्वस्तिक चिन्ह पूजले जाते.
ख्रिस्तपूर्व काळात युरोपमध्येही या चिन्हाचा वापर केला जात होता. परंतु पाश्चिमात्य जगात जेव्हा कोका-कोला आणि चार्ल्सबर्गसारख्या मोठमोठ्या ब्रँड्सनी याचा वापर सुरू केला तेव्हा हे चिन्ह तिथेही लोकप्रिय झाले. अगदी पहिल्या महायुद्धात अमेरिकन सैन्यानेही या चिन्हाचा वापर केला होता. परंतु जर्मनीतील राष्ट्रवादी आणि वंशवर्चस्ववादी नाझी संघटनेने आपल्या संघटनेचे प्रतीक म्हणून उलटे स्वस्तिक निवडले आणि स्वस्तिककडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला.
जर्मनीतील प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ हेन्रीच श्लाईमान(Heinrich Schliemann) यांनी १८७० मध्ये पहिल्यांदा जर्मनवासियांना स्वस्तिकची ओळख करून दिली. त्यांनी हे स्वस्तिक ४००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या ट्रॉय शहरातून शोधून आणले होते. होमरच्या काव्यात ज्या ट्रॉय शहराचा उल्लेख आढळतो तेच हे ट्रॉय. याचा शोध घेण्यात श्लाईमानची बरीच वर्षे अशीच निघून गेली. यांनंतर श्लाईमान जगभर इतिहासाचा अभ्यास करत फिरला. संपूर्ण आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतही त्याला हे चिन्ह सापडले. त्याच्या या अभ्यासामुळे पाश्चिमात्य जगात स्वस्तिक चिन्ह अधिक लोकप्रिय झाले.


