'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या जोडप्याने त्यांना मदत करणाऱ्या युट्युबरवरच गुन्हा का दाखल केला? काय आहे संपूर्ण प्रकरण ?

लिस्टिकल
'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या जोडप्याने त्यांना मदत करणाऱ्या युट्युबरवरच गुन्हा का दाखल केला? काय आहे संपूर्ण प्रकरण ?

सोशल मीडियावर देणगी देताना सगळी माहिती असल्यावर मगच पैसे द्यावेत ही एक किमान अपेक्षा असते. कारण बऱ्याचवेळा लोकांच्या भावनांचा वापर करून पैसे उकळण्याचे धंदे सोशल मीडियावर सर्रास होत असतात.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या ताकदीचा अनुभव सगळ्यांनी घेतला. दिल्लीतील बाबा का ढाबा रात्रीत प्रसिद्ध झाला होता. ज्या ढाब्यावर कोणी फिरकत नव्हता तिथे पब्लिकच पब्लिक दिसत होती. बाबा का ढाबावाले बाबा रात्रीत सेलेब्रिटी झाले.

या बाबांचे खरे नाव कांता प्रसाद आहे. त्यांचा ढाबा प्रसिध्द झाला तो गौरव वासन नावाच्या एका युट्युबरने त्यांचा विडिओ बनवून युट्युबवर पोस्ट केल्यानंतर. पण आता याच गौरव वासन विरुद्ध कांता प्रसाद हे पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत.

या गौरव वासनने केले काय, तर बाबा का ढाबाच्या बाबांना मदत करा म्हणून स्वतःच्या चॅनेलवरून लोकांना अपील केली. त्याने मदत देण्यासाठी जो अकाउंट नंबर दिला होता तो स्वतःचा आणि त्याच्या जवळच्या लोकांचा होता. आता साहजिक जी काही मदत आली ती त्याच्या अकाउंटमध्ये जमा झाली.

या बाबांचे म्हणणे आहे की हा गौरव वासन त्यांना जमा झालेल्या पैशांची कुठलीही माहिती द्यायला तयार नाही. त्यांना वासनकडून फक्त 2 लाखाचा एक चेक मिळाला आहे. त्या बाबांनी पुढे असेही नमूद केले की, आता आधी सारखे गिऱ्हाईक त्यांच्याकडे येत नाहीत, सुरुवातीला होणारा 10 हजारांचा गल्ला आता 2-3 हजारवर आला आहे. लोक तिथे फक्त सेल्फी घ्यायला येतात. तसेच गौरवने स्वतःच्या लोकांचे अकाउंट नंबर देऊन खूप पैसे गोळा केला आहे. असे सगळे आरोप करत त्यांनी गौरवविरुद्ध थेट फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

यावर गौरवने स्वतःची बाजू मांडताना सांगितले की, बाबांना त्रास होऊ नये म्हणून आपण स्वतःचे बँक डिटेल्स शेयर केले. त्याने २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या व्यवहाराच्या तीन रिसीट देखील शेयर केल्या आहेत. त्यात एक लाखाचा तर एक 2 लाख 33 हजाराचा चेक तर एक 45 हजाराची बँक पेमेंटची रिसीट यांचा समावेश आहे. त्याने सांगीतले की हे पैसे त्याच्याकडे तीन दिवसात जमा झाले होते. सोबत त्याने फेसबुकवर बँक स्टेटमेंट टाकले आहे. त्यात तीन दिवसांत साडे तीन लाख जमा झाल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे काही युट्युबर्सनी गौरववर जवळपास 20 ते 25 लाख रुपये गोळा केल्याचा आरोप केला आहे. या सगळ्यांवर आपण गुन्हा दाखल करणार आहोत असे गौरवने सांगितले आहे. आता पोलीस तपास सुरू झाल्यावर नेमकी काय हेराफेरी झाली आहे हे समोर येईलच. तोवर मात्र अशा कुठल्याही ठिकाणी पैसे देताना मात्र आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.