या आधीच्या लेखात आपण बघितले की प्रत्येक कुळाच्या सोबत एक वनस्पती जोडलेली असते. पण हे फक्त भारतातच. बाकीच्या देशांमध्ये असे काही नसल्याने त्यांनी प्रत्येक फुलासोबत एकेक महिना जोडलेला आहे. म्हणजे एखाद्याचा जन्म ऑक्टोबर महिन्यात झाला असेल तर त्याचे फूल झेंडू आणि झेंडूसोबत त्याचे गुण विशेष पण सांगीतले जातात. झेंडू हे लालित्याचे, भक्तिचे प्रतिक समजले जाते. असे म्हणतात की एखाद्या महिन्यासोबत फुलाचे नाव जोडण्याची प्रथा रोमन लोकांनी सुरु केली. नैसर्गिक अविष्काराचे कौतुक करण्याची ही पध्दत आहे. आजच्या लेखात अशा 'बर्थ फ्लॉवर' आणि त्याच्या स्वभावाबद्दल वाचूया.
बोभाटाची बाग : भाग २५ - 'बर्थ फ्लॉवर म्हणजे काय? एखाद्या महिन्यासोबत फुलाचे नाव जोडण्याची प्रथा किती जुनी आहे?


कार्नेशिया:
या फुलांचा वापर आजकाल आपल्याकडे बराच वाढला आहे. मूळ भू-मध्य समुद्री देशातील या फुलाची लागवड गेली २००० वर्षे सर्वत्र करण्यात येते. असे म्हणतात की रोमन देवता डायना एका मेंढपाळाच्या प्रेमात पडली. पण त्याने तिला अव्हेरले म्हणून रागाने डायनाने त्याचे डोळे खुडून जमीनीवर फेकले. त्यातून जन्माला आलेले फूल म्हणजे कार्नेशिया. आता हे फूल बर्याच वेगवेगळ्या रंगात मिळते, पण मूळ रंग जांभळ्याकडे झुकणारा गुलाबी होता असे समजले जाते. प्रेम आणि मोहाचे प्रतिक समजल्या जाणार्या फुलाचा महिना आहे जानेवारी!

व्हायोला :
व्हायोला म्हणजे निळ्या जांभळ्या रंगाची फुलं, जगात वेगवेगळ्या ५००/६०० प्रजातीत बघायला मिळतात. प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर वेगवेगळ्या पध्दतीने होतो. काही देशांत सजावटीसाठी डेकोरेशनसाठी, तर काही देशांत अन्नपदार्थाला रंग देण्यासाठी वापरतात. सत्यवादी, विश्वास , बुद्धिमत्ता आणि आशा यांचे प्रतिक असलेल्या या फुलाचा महिना आहे फेब्रुवारी.

डॅफोडील:
वसंत ऋतू , पुनर्जन्म, गृहसौख्य, आदर, मैत्री अशी अनेक गुणविशेष असलेले फुल म्हणजे डॅफोडील! शतकानुशतके याची लागवड केल्यामुळे डॅफोडीलच्या हजारो प्रजाती निर्माण झाल्या आहेत. त्यापैकी नार्सीसस या जातीतली फुले विषारी असतात. नार्सीसस हे स्वत:च्याच प्रतिबिंबाच्या प्रेमात पडलेल्या माणसाचे प्रतिक समजले जाते. या फुलातील विषाचा उपयोग डिमेंशिआ किंवा अल्झायमरवर औषध म्हणून केला जातो. वसंत ऋतूचे प्रतिक म्हटल्यावर या फुलाचा महिना मार्च आहे हे वेगळे सांगायलाच नको.

डेझी:
शुध्दता, पावित्र्य, निष्पाप, निर्व्याज स्वभावाचे प्रतिक म्हणजे डेझी! प्राचीन काळी युध्दावर जाताना रोमन सैनिक ही फुलं सोबत घेऊन जायचे. या फुलांच्या रसात स्नायू आक्रसून घेण्याचा गुण आहे म्हणून त्या रसात बुडवलेल्या पट्ट्या युध्दात झालेल्या जखमांवर बांधण्यात यायच्या. लॅटीन भाषेत bellum म्हणजे युध्द म्हणून याचे नाव Bellis perennis असे आहे.

लिली ऑफ द व्हॅली:
प्रेमाचे प्रतिक असलेल्या या फूलाचे स्थान अर्थात नववधूच्या हातात असलेल्या पुष्पगुच्छात असते. प्रेमासोबत त्या फुलाचे अनेक अर्थ आहेत, पण ते रंगाप्रमाणे बदलतात. जगातल्या अग्रगण्य फॅशन डिझायनरमध्ये गणल्या जाणार्या क्रिश्चन डॉयरचे हे आवडते फूल. या फुलातून त्याने डायरोसिमो नावाचा प्रख्यात सुगंध बनवला होता. मराठी कवी पु.शि. रेगे यांच्या कवितेशिवाय मे महिन्याच्या या लिलीचे वर्णन अपुरेच राहिल.
लिलीची फुले तिने
एकदा चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले....!
लिलीची फुले आता
कधीही पाहता, डोळां
पाणी हे साकळे....!

हनीसकल:
या फुलाच्या नावातच सगळे काही आले. मधाच्या आशेने या फुलाभोवती अनेक किटक रुंजी घालत असतात. याच्या काही जाती हिमालयाच्या पायथ्याशी पण उगवतात. कृतज्ञता, माया आणि कौतुक यांचे प्रतिक असलेल्या या फुलाचा महिन आहे जून!
वाचकहो, हा झाला वर्षातल्या सहा महिन्याचा हिशोब, पुढच्या सहा महिन्यांच्या फुलांना आपण भेटू या बोभाटाच्या बागेत येत्या सोमवारी!
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलबसचं रुपांतर शाळेत? कोणी आणि कुठे केलं आहे?
२४ ऑगस्ट, २०२१