२००९ मध्ये शहीद होण्यापूर्वी २००४ साली मेजर शर्मा यांनी थेट अतिकेरी बनून हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेत प्रवेश घेत, त्यांना गुंगारा दिला होता. अबू तोरारा आणि अबू समझार या दोन कुख्यात अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी त्यांनी जबरदस्त धाडसी अस प्लॅन आखला. आपली संपूर्ण वेशभूषा बदलत ते अतिरेक्याचे रूप घेऊन या लोकांमध्ये शिरले.
इफ्तीखार भट असे नाव त्यांनी धारण केले. या दोन्ही अतिरेक्यांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांनी आपला भाऊ भारतीय सैन्याकडून मारला गेला म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी आपण तुमच्यात सामील होत आहोत असे त्यांनी सांगितले होते. मेजर शर्मा यांनी या दोघांचा विश्वास संपादन करून भारतीय आर्मी चेक पॉईंटवर हल्ला करण्याचा प्लॅन आखला.
जेव्हा दोन्ही अतिरेकी आपण काहीदिवस अंडरग्राऊंड राहून मदत मिळवू असे म्हणू लागले, तेव्हा जे काही करायचे ते आपणच करू असे म्हणत मेजर शर्मांनी या दोघांना परत जाऊ दिले नाही. पण हे अतिरेकीही काही कच्चे नसतात, ते वेळोवेळी मेजर शर्मा यांच्याकडून ओळख मागायचे, पण दरवेळी मेजर त्यांना काहीतरी कारण सांगून उडवून लावायचे.
एके दिवशी फक्त हे तीन लोक उपस्थित असताना त्यांनी जेव्हा परत ओळखीचा विषय काढला, तेव्हा मेजर शर्मा यांनी आपली बंदूक फेकून दिली आणि म्हणाले, 'माझ्यावर विश्वास नसेल तर ही घ्या बंदूक आणि मला मारून टाका'. आता दोन्ही अतिरेकी संभ्रमात पडले होते. पण मेजर समजून चुकले होते, आपला हा गेम काही जास्त काळ चालणार नाही.
बाजूला पडलेली बंदूक उचलत मेजर शर्मांनी एकामागून एक दोघांच्या छातीत गोळ्या घातल्या. दोन्ही अतिरेकी सावरू देखील शकले नाहीत. अशा पद्धतीने मेजर शर्मा यांनी स्वतःच्या जीवाची जोखीम घेत देशाचे दोन मोठे शत्रू संपविले होते. आपला भारतीय पठ्ठ्या पाकिस्तानी जमिनीवर त्यांना मारून भारतात परतला होता.