कालचा दिवस संगीतप्रेमींसाठी फारच वाईट बातमी घेऊन आला. महाराष्ट्रातील तीन पिढ्यांचे कान आपल्या व्हायोलिन वादनातुन तृप्त करणारे प्रसिध्द व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांचे पुण्यात निधन झाले आहे. गीतरामायणाला आपल्या व्हायोलिनवादनाने समृद्ध करणारे म्हणून प्रभाकर जोग यांची ओळख मराठी मनात कायमस्वरूपी कोरली गेली आहे.
ते १२ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जोगांनी पुण्यात व्हायोलीन वादनास सुरुवात केली होती. या कमी वयात घरांमध्ये गाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास थेट देश-विदेशात ५०० पेक्षा अधिक कार्यक्रम करून थांबला आहे. ज्यांच्या वादनातून शब्द ऐकू येतात असे म्हटले जायचे. म्हणून 'गाणारे व्हायोलिन' आता शांत झाले अशा दु:ख व्यक्त करणार्या प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत.



